पुण्यातील 'तो' फलक बनलाय चर्चेचा मुद्दा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

नामफलकावर संकल्पना म्हणून स्वतःचे नाव टाकायचे व स्वतःची जाहीरात करुन घेण्याच्या प्रवृत्तीला विरोध होवूनही पुन्हा पुन्हा असे प्रकार घडत असल्याने चर्चेचा धुराळा उडाला आहे.

कोथरुड : एखाद्या जुन्या कामाच्या ठिकाणी स्वतःच्या नावाची पाटी लावायची आणि संकल्पना म्हणून स्वतः श्रेय घ्यायचे या श्रेयवादी प्रवृत्तीवर अनेकदा टीका झाली आहे. नामफलकावर संकल्पना म्हणून स्वतःचे नाव टाकायचे व स्वतःची जाहीरात करुन घेण्याच्या प्रवृत्तीला विरोध होवूनही पुन्हा पुन्हा असे प्रकार घडत असल्याने चर्चेचा धुराळा उडाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे महानगरपालिकेच्यावतीने कोथरुडमधील पहिला उड्डाणपुल दशभुजा गणपती येथे बांधण्यात आला. त्यावेळेस पालिकेत काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी या पुलाचे नामकरण स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर असे करण्यात आले. आता या पुलाच्याखाली नव्याने जो नामफलक बसवण्यात आला आहे त्यावर संकल्पना म्हणून आमदार चंद्रकांत पाटलांचे नाव टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर खासदार गिरीश बापट, नगरसेविका छाया मारणे यांचे नाव या फलकावर आहे. पाटीवरच्या मजकुरात अचानक झालेला हा बदल अनेकांना खटकला. त्यामुळे समाज माध्यमावर या पाटीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

फलक लावण्याची संकल्पना तुमची असेल पुल उभारण्याची नव्हे. त्यामुळे फलकावर या बाबीपण स्पष्ट केल्या असत्या तर बरे झाले असते. मुळातच अशा प्रकारे नागरिकांच्या खर्चातून फलक लावतातच कशाला. रस्ता, पुल, वा महत्वाच्या ठिकाणी लावले जाणारे नामफलक, दिशादर्शक फलकांवर अशाप्रकारे स्वतःचे नाव लावणे हे बंद करावे अशी चर्चा नागरीकांमध्ये आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर हे वंदनीय नाव भाजपवाल्यांनी राजकारणासाठी वापरून घेतल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेतच. त्यांना भारतरत्न देण्याची मागणीही जोर धरते तेव्हा भाजपवाले मूक गिळून गप्प बसतात. पण पूर्वीपासूनच 'स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल' असे नाव असलेल्या या पुलाचे श्रेय घेण्यासाठी चाललेली ही तडफड अनाकलनीय आहे. म्हणजे स्वतः नवीन काही निर्माण करायचं नाहीच, पण इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेत आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा हा उद्योग आहे.-विशाल भेलके, स्थानिक नागरिक  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

मी काही एवढा छोट्या मनाचा नाहीये की दुस-याच्या कामाचे क्रेडीट घ्यायला. ह्या पेक्षाही खुप मोठी कामे केली आहेत. पण कधीही क्रेडीट घेतलं नाही.... शिवाय ती पाटी मी लावलेली नाही किंवा माझ्या सांगण्यावरुन लावलेली नाही.... त्यामुळे ते क्रेडिट घ्यायचा प्रश्नच नाही.- चंद्रकांत पाटील, आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष 
 
पुलाविषयी- या पुलाचे काम 1996 साली सुरु झाले व 1999 साली या पुलाचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यात शिवसेना भाजपा युतीची सत्ता होती तर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता होती.  

(Edited by : Sagar Diliprao Shelar)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics from the board in Pune