प्रकल्पांच्या नावावरून राजकीय कुरघोडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

पुणे - विकासकामांवरून श्रेयाचे राजकारण करणारे नगरसेवक आता प्रकल्पांच्या नावांवरूनही राजकीय कुरघोडी करीत आहेत. प्रकल्पांच्या नावाबाबत आपल्या प्रस्तावाचा विचार व्हावा, यासाठी नेत्यांकडून दबाव आणण्याची खेळी ही मंडळी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्वेनगरमधील उड्डाण पूल, विविध भागांतील उद्याने, रस्ते, चौक आणि भुयारी मार्गांना नावे देण्याचे 39 प्रस्ताव नगरसेवकांनी महापालिकेच्या नाव समितीपुढे मांडले आहेत. 

दुसरीकडे, या आधी देण्यात आलेली नावे बदलण्यात येणार नसल्याची महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे केवळ राजकीय उद्देशापोटी मांडलेल्या प्रस्तावांवर विचार होण्याची शक्‍यता नसल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे. 

विकासकामांना आपल्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांची नावे देण्यास मर्यादा घालण्यात आल्या आहेत. तरीही, आपल्या पक्षाचे नेते आणि अन्य मंडळींची नावे देऊन प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न नगरसेवक करतात. या पार्श्‍वभूमीवर त्या-त्या प्रभागातील चारपैकी तीन नगरसेवकांच्या सहमतीनंतरच प्रभागातील विकासकामांना नाव देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तरीही, एकमेकांवर कुरघोडी करीत, ही मंडळी नवीन प्रस्ताव मांडत असल्याचे दिसून आले आहे. 

भाजपचीच कोंडी 
कर्वेनगरमधील उड्डाण पुलाचे नाव बदलून आपल्या प्रस्तावाचा विचार करण्याचा आग्रह सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाने धरला आहे. हा प्रस्ताव मान्य व्हावा, यासाठी नगरसेवकाने आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. त्यानंतर सभागृह नेत्याने मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला. अशा परिस्थितीत अन्य प्रभागांमधूनही प्रस्ताव आले असून, त्यातील बहुतांश नगरसेवकांनी आपल्याच प्रस्तावांचा आग्रह धरल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावांमुळे सत्ताधारी भाजपचीच कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रभागातील विकासकामांना नावे देण्यासंदर्भात नियमावली आहे. तिचा आधार घेऊनच प्रस्ताव मंजूर केले जातात. नव्याने आलेल्या प्रस्तावांवरही नाव समितीच्या बैठकीत निर्णय होईल. पण, मूळ नियमानुसारच कार्यवाही करण्यात येईल. 
- मुक्ता टिळक, महापौर 

Web Title: Politics from the names of the projects