वर्षातील 81 दिवस पुणेकर धुलिकणांच्या विळख्यात 

योगीराज प्रभुणे
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - पुणेकरांनी गेल्या वर्षभरातील 81 दिवसांमध्ये धुळीमध्येच प्रत्येक श्‍वास घेतला आहे. या पूर्वीच्या वर्षात हे प्रमाण 70 दिवस होते. मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 154 दिवस धूलिकणांचे प्रमाण धोकादायक पातळीच्या वर होते. त्या खालोखाल नाशिकचा क्रमांक लागला आहे. 

पुणे - पुणेकरांनी गेल्या वर्षभरातील 81 दिवसांमध्ये धुळीमध्येच प्रत्येक श्‍वास घेतला आहे. या पूर्वीच्या वर्षात हे प्रमाण 70 दिवस होते. मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 154 दिवस धूलिकणांचे प्रमाण धोकादायक पातळीच्या वर होते. त्या खालोखाल नाशिकचा क्रमांक लागला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली. त्यात भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. प्रदूषित शहरांमध्ये कानपूर हे पहिल्या क्रमांकावर असून, दिल्लीचा सहावा क्रमांक आहे. फरिदाबाद, गया, आग्रा, जयपूर, पाटणा, मुझफ्फरपूर, श्रीनगर, गुडगाव, पटियाला, जोधपूर या शहरांचा त्यात समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या शहरांमधील हवेत तरंगणाऱ्या सूक्ष्म धूलिकणांची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) घेण्यात आली. त्याच्या विश्‍लेषणावरून हा निष्कर्ष निघाला आहे. 

पुण्यात वाढताहेत सूक्ष्म धूलिकण 
"एमपीसीबी'तर्फे कर्वे रस्त्यावर सातत्याने हवेची गुणवत्ता मोजली जाते. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या दरम्यान 323 दिवस हवेची गुणवत्ता मोजण्यात आली. त्यापैकी 70 दिवस हवेत तरंगणाऱ्या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण 100 मायक्रॉन प्रतिघन मीटरपेक्षा जास्त होते. या वर्षी 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत मोजण्यात आलेल्या 339 पैकी 81 दिवस हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण धोक्‍याच्या पातळीवर होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत अकराने खराब हवेचे दिवस वाढल्याची माहिती यातून पुढे येत आहे. 

मुंबईत गेल्या वर्षीएवढे प्रमाण 
मुंबईकरांनी गेल्या वर्षभरातील 155 दिवस हवेतील धूलिकणांचे प्रमाण 100 मायक्रॉनपेक्षा जास्त नोंद गेले होते. या वर्षी हे प्रमाण 154 होते. त्यामुळे मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेत फारसा फरक पडलेला दिसत नाही. 

नाशिकचा धोका वाढला 
नाशिकमध्ये गेल्या आर्थिक वर्षात 234 पैकी जेमतेम 43 दिवस हवेत धूलिकणांचे प्रमाण जास्त होते. चांगली हवा असलेले 191 दिवस होते. पण, या वर्षी खराब हवेच्या दिवसांची संख्या 43 वरून 72 पर्यंत वाढली. तर, चांगल्या हवेचे दिवस 191 वरून 172 झाले. या वर्षी "एमपीसीबी'मध्ये 244 दिवस हवेची गुणवत्ता तपासली आहे. 

नागपूर येथे गेल्या वर्षी 36 दिवस हवेत धूलिकणांचे प्रमाण जास्त होते. त्या वेळी 280 दिवस हवेची गुणवत्ता तपासण्यात आली होती. या वर्षी 300 दिवस तपासलेल्या हवेच्या गुणवत्तेत 15 दिवस खराब धूलिकण होते. 

Web Title: pollution in pune