डाळिंब यार्डचा अहवाल गुलदस्तातच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

दोन अडते, दोन हमाल आणि बाजार समितीचे अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. याबाबत नऊ तारखेला शेवटची बैठक होऊन तो अहवाल समिती सादर करेल. त्यानंतर साधारणतः १५ तारखेपर्यंत तो प्रसिद्ध केला जाईल.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती

मार्केट यार्ड - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब यार्डमधील चार अडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी आणि खरेदीदारांची हमाली आणि लेव्हीच्या रकमेत नियमापेक्षा जास्त कपात करत, सुमारे १५ कोटींची लूट केल्याचा आरोप आहे. मात्र, आठ महिन्यांपासून या प्रकरणात काहीही कार्यवाही झाली नसल्याचे पुढे आले आहे.  

या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने खासगी सीएंची नियुक्ती करून, संशयित अडत्यांची दफ्तरतपासणी हाती घेतली. यासाठी खासगी ८ सनदी लेखापालांची (सीए) नेमणूक केली होती. सुमारे पन्नास अडत्यांची दफ्तरे ताब्यात घेतली होती. मात्र त्यानंतर पुढे काय झाले, हे अद्यापही उघड झाले नाही. त्याचा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला नाही. 

याप्रकरणाबाबत काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील ४-५ दिवसांत आम्ही याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करणार आहोत, असे बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांनी गेल्या दोन महिन्यांत चार ते पाच वेळेस माध्यमांना सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate Yard Report