पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला; भाऊ, मित्राचा जबाब निर्णायक

टीम ई-सकाळ
Saturday, 13 February 2021

मूळची बीडमधील परळी येथील रहिवासी असलेली पूजा लहू चव्हाण ही स्पोकन इंग्लिशचा अभ्यासक्रमासाठी पुण्यात आली होती.

पुणे : वानवडी येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या टिकटॉक स्टार पुजा चव्हाण हिचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामध्ये डोक्‍याला व मणक्‍याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. तर, पुजाचा भाऊ व त्याच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी दारू केल्याचे स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा - पुण्यात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान

काय घडले कधी घडले?
मूळची बीडमधील परळी येथील रहिवासी असलेली पूजा लहू चव्हाण (वय 22) ही स्पोकन इंग्लिशचा अभ्यासक्रमासाठी पुण्यात आली होती. महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क या उच्चभ्रू सोसायटीमध्ये तिचा चुलत भाऊ व त्याच्या मित्रासमवेत ती राहात होती. दरम्यान, रविवारी (7 फेब्रुवारी) मध्यरात्री ती राहात असलेल्या इमारतीवरून उडी मारून पूजाने आत्महत्या केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पूजाच्या आत्महत्येशी महाआघाडी सरकारमधील एका राज्य मंत्र्याचा संबंध जोडला गेल्याने काही दिवसांपासून या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

आणखी वाचा - पुणे-बारामती मेमू रेल्वेसाठी सरसावल्या सुप्रिया सुळे

काय आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट?
दरम्यान, पूजाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिचा शवविच्छेदन अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाला. याविषयी वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड म्हणाले, 'पूजाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्या डोक्‍याला व मणक्‍याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आला आहे. तिचा चुलत भाऊ व त्याच्या मित्राचा आम्ही जबाब नोंदवून घेतला आहे. घटना घडली, त्या रात्री पूजाने मद्यप्राशन केले होते, असे त्यांच्या जबाबामध्ये नमूद करण्यात आले आहे.' पूजाच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय किंवा अन्य कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आले नसल्याचे परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pooja lahu chavan suicide postmortem report