पूना मर्चंट चेंबरचा बाजार समितीत मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

डॉ. बाबा आढाव यांचा मंगळवारपासून उपोषणाचा इशारा
तोलणारांना कामावर रुजू करून घेण्याबाबत सोमवारपर्यंत (दि. ५) राज्य सरकाने निर्णय घ्यावा; अन्यथा मंगळवारपासून (ता. ६) मार्केट यार्डातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव बेमुदत उपोषण करणार आहेत. यात संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन राज्याचे पणनमंत्री राम शिंदे व पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांना दिले असल्याची माहिती महामंडळाचे सहसचिव हनुमंत बहिरट यांनी दिली.

मार्केट यार्ड - गेल्या पाच दिवसांपासून हमाल मापाडी संघटनेचा तोलाई प्रश्‍नावर बेमुदत संप सुरू आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने दि पूना मर्चंट चेंबरने गुलटेकडी येथील बाजार समितीच्या मुख्य कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढला. या प्रश्‍नावर लवकर मार्ग काढून भुसार बाजार पूर्ववत करण्याची मागणी चेंबरच्या वतीने करण्यात आली.

चेंबरच्या वतीने बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना या वेळी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की भुसार बाजारात तोलाईप्रश्नी हमाल पंचायतीने पुकारलेला संप बेकायदा आहे. यामुळे शहरातील खाद्यान्न वस्तूंच्या पुरवठ्यावर गेल्या पाच दिवसांपासून परिणाम झाला आहे. हा संप मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत. चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, ‘‘गूळ भुसार विभागातील सर्व दुकाने सुरू आहेत. ग्राहकांनी स्वतःचे वाहन आणल्यास त्यांना व्यापारी माल भरून देतील. यात कोणी अडचण आणण्याचा प्रयत्न केल्यास बाजार समितीचे अधिकारी आणि पोलिस कारवाई करतील.’’ मोर्चात उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, वालचंद संचेती, अशोक लोढा, प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, अजित बोरा यांच्यासह व्यापारी सहभागी झाले होते.

बाजारातील संपाबाबत पणनमंत्री आणि पणन संचालकांशी माझी चर्चा झाली आहे. मुंबईत मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीच्या दिवशी पणनमंत्री व पणन संचालक हे हमाल पंचायत आणि चेंबरच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्‍न मार्गी लावणार आहेत.  
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poona Merchant Chamber Market Committee Rally