पुणे झेडपीच्या विषय समित्यांची नावे बदलणार?                      

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नावात यंदा बदल होण्याची शक्यता आहे.

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नावात यंदा बदल होण्याची शक्यता आहे. याला महिला व बालकल्याण आणि सामाजिक न्याय या दोन समित्या मात्र अपवाद असणार आहेत. कारण नियमानुसार या दोन्ही समित्यांची नावे बदलता येत नाहीत.

पुणे जिल्हा परिषदेचे सभापती ठरले; पाहा कोणाच्या गळ्यात पडली माळ

याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती असलेल्या समित्यांची नावे बदलता येत नाहीत. मात्र एकूण दहापैकी चार समित्यांचा अपवाद वगळता अन्य सहा समित्यांची नावे बदलण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना आहे. त्यानुसार विषय समित्यांच्या कामकाजाचे वाटप करताना, अध्यक्ष हे त्यांच्या अधिकारात नावे बदलून शकतात. उदाहरणार्थ पुणे जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण आणि अर्थ समितीचा पदभार उपाध्यक्षांकडे आहे. त्याऐवजी हीच समिती शिक्षण आणि आरोग्य अशीही करता येऊ शकते.

याशिवाय बांधकाम व आरोग्य समिती ऐवजी तिचे नाव बांधकाम व शिक्षण किंवा बांधकाम व अर्थ समिती असेही करता येते. लातूर जिल्हा परिषदेत शिक्षण व कृषी अशी समिती अस्तित्वात आहे.          

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आजतागायत विषय समित्यांची अंतर्गत नावे बदलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे यंदा या नावात किंचितसा बदल करण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र या समित्यांची नावे बदलणार की पूर्वी प्रमाणेच कायम राहणार, हे विषय समिती कामकाज वाटपानंतरच कळू शकणार आहे.            

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे या आज (ता. 24) दुपारी साडेचार वाजता समिती कामकाजाचे वाटप करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of change in in name of Pune ZP committee