भ्रष्टाचाराचा अनुभव आहे तर भाजपत प्रवेश; हडपसरमध्ये झळकले पोस्टर

ज्ञानेश सावंत 
सोमवार, 29 जुलै 2019

- भाजपमध्ये प्रवेश देणे आहे' ! अशा आशयाचे फलक हडपसरमध्ये झळकत आहे.

-  एवढेच नाही तर 'ईडी' आणि 'इन्कम टॅक्‍स'ची नेटिस आलेल्या नेत्यांना प्राधान्य

पुणे : राज्यभरातील दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. किंबहुना सर्वच पक्षांतील नेत्यांसाठी भाजपने 'रेड कार्पोरेट' अंथरले असतानाच या पक्षातील 'इनकमिंग' आता चेष्टेचा विषय ठरला. 'भाजपमध्ये प्रवेश देणे आहे' ! अशा आशयाचे फलक हडपसरमध्ये झळकत आहे. एवढेच नाही तर 'ईडी' आणि 'इन्कम टॅक्‍स'ची नेटिस आलेल्या नेत्यांना प्राधान्य असल्याचे सांगत, भाजपच्या रणनीतीची खिल्लीही या फलकातून उडविली आहे. परिणामी, या फलकवरील मजुकराची पुण्याच्या राजकीय क्षेत्रात चवीने चर्चा सुरू आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अन्य पक्षातील नेते प्रवेश करीत आहेत. विशेषत : राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पाडण्याचा बेत आखून भाजपच्या नेत्यांनी या पक्षातील नेत्यांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तपास यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना पक्षांतर करण्यास भाग पडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. त्यानंतर आणखी काही नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे भाजप नेते बोलून दाखवत आहेत. 

सत्ताधारी आणि विरोधकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालविली असतानाच अशा प्रकारे पक्षांतराची मालिका असल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर हडपसरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी आपल्या 'स्टाइल'ने असे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे, ससाणे हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. या भागाचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि सासणे यांच्यातील राजकीय संघर्षातूनच भाजपला 'टार्गेट' केले जात असल्याचे बोलले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: posters against bjp in Hadapsar