MPSC परीक्षेसह नोकरभरती पुढे ढकलावी; विनायक मेटेंची शरद पवारांकडे मागणी

Vinayak_Mete
Vinayak_Mete

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मार्च महिन्यात सलग सुनावणी होणार असून, मार्चअखेरीस ठोस निकाल लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारने मार्चअखेरपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा आणि विविध खात्यातील नोकरभरती पुढे ढकलावी, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली. पत्रकार भवनात बुधवारी (ता.२४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मेटे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला ९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरिम स्थगिती दिली आहे. परंतु काही मंत्र्यांनी त्यांच्या खात्यात नोकरभरतीचा कार्यक्रम घाईने चालवला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भेटून नोकरभरती पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. नोकरभरती पुढे ढकलल्यास कोणाचेही नुकसान होणार नाही. पण तसे न झाल्यास राज्यातील मराठा समाजातील मुलामुलींचे नुकसान कधीही भरून येणार नाही. 

सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकविण्याबाबतीत आघाडी सरकार अजूनही गंभीर नाही. सर्व याचिकाकर्ते आणि त्यांच्या वकिलांचा समन्वय करून रणनीती ठरवणे गरजेचे आहे. हरीश साळवे यांच्यासारखे निष्णात विधिज्ञ नेमण्याची मागणी केली, त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

शिवसंग्राम आणि इतर मराठा संघटनांच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात एल्गार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोरोनाविषयक आवाहनाला मान देत पुढील एल्गार मेळावे तूर्तास थांबवले आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन धुडकावत शक्तिप्रदर्शन करतात पण आम्ही मात्र त्यांचा सन्मान राखला, असे मेटे यांनी सांगितले. 

नुकत्याच आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन पोलिस चौकशी करावी. गुन्ह्यात नावाची चर्चा असताना समाजाचा आधार घेण्याची ही प्रवृत्ती घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेस शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, विदर्भ विभाग अध्यक्ष प्रशांत गोळे, पुणे महिला अध्यक्षा कालिंदी गोडांबे आदी उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com