‘पोस्टवुमन’ पन्हाळेंना अनेक कुटुंबांत मान (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नऊ ऑक्‍टोबर हा ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्तानं पुण्यातील ‘पोस्टवुमन’ लता पन्हाळे यांच्याशी केलेली बातचीत...

पुणे - नऊ ऑक्‍टोबर हा ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्तानं पुण्यातील ‘पोस्टवुमन’ लता पन्हाळे यांच्याशी केलेली बातचीत...

यंदा पन्नासावा टपाल दिन असल्याचा आनंद मागील पिढीला आहे. यामागचं कारण असं, की पूर्वी पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र, पोस्टाची पाकिटं यांतून पत्रव्यवहार होई. आतासारखं संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमातून संदेशवहन होत नसे. तो काळ अनुभवलेल्या अनेकांच्या मनात टपाल हा विषय आजही घर करून आहे. लता रमेश पन्हाळे या ‘पोस्टवुमन’ सिटी पोस्टात एक जानेवारी १९८३ रोजी रुजू झाल्या. तेव्हापासून आजतागायत कार्यरत आहेत. दररोज सुमारे दहा ते बारा किलोमीटरची पायपीट करीत घरोघरी टपाल देण्यात त्यांना समाधान वाटतं.

पन्हाळे म्हणाल्या, ‘‘अप्पा बळवंत चौक, ‘सकाळ’ कार्यालयाचा परिसर, तुळशीबाग आदी भागांत मी टपाल देते. काळ बदलला असला आणि लोक मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवत असले, तरी अनेक घरांमध्ये आजही टपाल जात असतं. वाहनासंदर्भातलं स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, बॅंकेचे चेकबुक, मनीऑर्डर कधी येणार याची लोक आतुरतेनं वाट बघत असतात. गेल्या ३५-३६ वर्षांत दोन-तीन पिढ्यांनी माझ्याकडून टपाल स्वीकारलं आहे. थोरली पिढी धाकट्यांना आमच्याबद्दल सांगत असते.’’ 

‘अनेक जणांना नोकरीचा कॉल, कुणाला लग्नासाठी वरपक्ष किंवा वधुपक्षाकडून पसंती, कधी कुणाला परीक्षेतलं यश टपालातून समजलं. त्या पत्राची वाट पाहत असलेल्यांनी मला थांबवून मिठाई दिली. लहानांनी वाकून नमस्कार केला. हा सगळा प्रवास मला भारावून टाकणारा आहे. बऱ्याच घरांमध्ये मला कुटुंबातील व्यक्ती म्हणून मान दिला जातो. ती माणसं रस्त्यात कुठं भेटल्यावर दोन शब्द बोलतात. माझ्यासाठी ही पुंजी मोलाची आहे,’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postwomen Lata Panhale discussion