esakal | हवेलीतील सात गावांचा वीजपुरवठा सुरळीत
sakal

बोलून बातमी शोधा

msedcl

हवेलीतील सात गावांचा वीजपुरवठा सुरळीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : हवेली (haveli) तालुक्यातील सात गावांचा खंडित झालेला वीजपुरवठा (Power supply) सुरळीत करण्यासाठी मुळा-मुठा नदीपात्रातील सुमारे ४५० मीटर लांबीच्या ओव्हरहेड वीजवाहिनीची दुरुस्ती महावितरणने (msedcl) केली. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेतून सुरु असलेल्या या गावांचा वीजपुरवठा बुधवारी पूर्ववत केला. (Power supply seven villages Haveli continue)

हवेली तालुक्यातील शिंदेवाडी व हिंगणगावामधील मुळा-मुठा नदीच्या पात्रात सुमारे ४५० मीटर लांबीची एक उच्चदाब वीजवाहिनी दोन दिवसांपूर्वी पावसामुळे तुटून नदीमध्ये पडली होती. त्यामुळे कोरेगाव मूळ, भवरापूर, आष्टापूर, टिळेकरवाडी, खामगाव टेक, हिंगणगाव व शिंदेवाडीतील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यातील पाच गावांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु केला. मात्र हिंगणगाव व शिंदेवाडीमधील ग्राहकांना सिंगल फेजचाच वीजपुरवठा केला होता. धरणातून पाणी सोडल्यामुळे मुळा-मुठाच्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने सुरु होता.

हेही वाचा: गारवा हॉटेल मालक खून प्रकरण; आरोपीच्या पत्नीला 'या' कारणामुळे अटक

त्यामुळे वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करता आले नाही. प्रवाहाचा जोर ओसरल्यानंतर मंगळवारी सकाळी बोटीने नदीपात्रात जाऊन वीजवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केले. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने संपूर्ण दिवस प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. त्यानंतर आज सकाळी साडेनऊला पुन्हा काम सुरु केले. वीजवाहिनी तळाशी जाऊ नये यासाठी ३५ लिटरचे २५ रिकामे प्लॅस्टिक कॅन वीजवाहिनीला बांधले व वाहिनी बोटीद्वारे पैलतीरावर नेण्यात आली.

हेही वाचा: आधी खड्डे बुजवा मग पुढचे काम करा; प्रशासनाला आदेश

त्यानंतर दुपारी तीनपर्यंत नवीन ओव्हरहेड वीजवाहिनीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर सातही गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, सहाय्यक अभियंता नईम सुतार, जनमित्र मोहन वरगड, रावसाहेब अंधारे यांच्यासह १६ कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

loading image
go to top