esakal | उभारी बांधा अन्‌ बिनधास्त राहा..!

बोलून बातमी शोधा

Pradip Kurulkar
उभारी बांधा अन्‌ बिनधास्त राहा..!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘कोरोना झाल्याचे समजल्यावर घाबरून न जाता त्याकडे संधी म्हणून पाहिले. नोकरीच्या निमित्ताने अनेक गोष्टी करायच्या राहिल्या होत्या, त्या पूर्ण केल्या. भरपूर वाचन आणि मनसोक्त शास्त्रीय संगीत ऐकले. मनाची उभारी असेल, तर काळजीचे काहीच कारण नाही...’’ असे सांगत होते आर.ॲण्ड डी.ए.चे संयुक्त निदेशक प्रदीप कुरुलकर.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी कोरोनाशी केलेले दोन हात बळ देणारे आहेत. कुरुलकर म्हणाले, ‘‘कामाच्या निमित्ताने आसाम, नागालँड, जोधपूर व अन्य काही भागात गेल्या महिना-दीड महिन्यात प्रवास झाला होता. त्यानंतर ऑफिसला आलो, तर काही सहकारी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. मलाही एक दिवस अचानक ताप आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडा ताप आला आणि कोणताच गंध येत नव्हता. थकवा जाणवायला लागला. कोरोना तपासणी केली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला.’’

हेही वाचा: ऑक्सिजन बेड उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु : चंद्रकांत पाटील

घरातच स्वतःला विलगीकरण करून घेतले. स्वतःचे एक वेळापत्रक तयार केले. शास्त्रीय संगीत ऐकायच्या आवडीने पुन्हा एकदा दाद दिली. कोणती गाणी ऐकायची हे मनाशी पक्के केले. दुपारी आणि सायंकाळी आवडत्या पुस्तकांचे वाचन आणि त्यातील आवडीच्या भागाचे नोट्स काढत होतो. दरम्यानच्या काळात न चुकता प्राणायाम करत होतो. आपल्याला मिळालेल्या वेळेकडे संधी म्हणून पाहिले. सर्वप्रथम सर्वांनी कोरोनाची भीती मनातून काढली पाहिजे. भितीचे विष मनात निर्माणच होऊ देऊ नये. मिळालेला वेळ सत्कारणी लावल्यास चांगला परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय करावे?

  • मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा

  • विनाकारण घाबरू नका

  • आवडीच्या बाबी करण्यावर भर द्या

  • प्राणायामासारखे व्यायाम करावेत