प्रगती एक्‍स्प्रेस 11 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

रेल्वे प्रशासनाने मंकी हिल ते कर्जत स्थानकादरम्यान रुळाच्या कामासाठी मागील दोन महिन्यांपासून पुणे ते मुंबई दरम्यान अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेससह अन्य 22 गाड्यांचा समावेश आहे. मात्र, 11 नोव्हेंबरपासून प्रगती एक्‍स्प्रेस पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

पुणे - रेल्वे प्रशासनाने मंकी हिल ते कर्जत स्थानकादरम्यान रुळाच्या कामासाठी मागील दोन महिन्यांपासून पुणे ते मुंबई दरम्यान अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेससह अन्य 22 गाड्यांचा समावेश आहे. मात्र, 11 नोव्हेंबरपासून प्रगती एक्‍स्प्रेस पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये असणाऱ्या मंकी हिल ते कर्जत स्थानकादरम्यान रुळाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासह तांत्रिक कामे केली जात आहेत. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यांपासून पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या प्रगती एक्‍स्प्रेसह सुमारे 22 गाड्या पुणे ते मुंबई दरम्यान नोव्हेंबर अखेरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाने प्रगती एक्‍स्प्रेस येत्या 11 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. दरम्यान, अन्य गाड्यांमध्ये करण्यात आलेले बदल कायम राहणार असल्याचेही रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

कर्जत स्थानकावर थांबणार डेक्कन क्वीन
मंकी हिल ते कर्जत दरम्यान रुळाच्या कामामुळे पुणे ते मुंबई दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. परिणामी, कर्जत स्थानकावरील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने डेक्कन क्वीन एक्‍स्प्रेसला कर्जत स्थानकावर एक मिनिटाचा थांबा दिला आहे. हा थांबा येत्या बुधवारपासून (ता.6) रविवारपर्यंत (ता.10) असणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragati express start from 11th november