राज्यघटना बदलाचे कारस्थान मोडून काढू - ॲड. प्रकाश आंबेडकर

Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar

पिंपरी - ‘देशात राजकीय व आर्थिक सत्ता एकवटण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यामुळे वंचितांचा आवाज दाबला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत हा आवाज बुलंद करणे गरजेचे आहे. देशात राज्यघटना बदलण्याचे सुरू असलेले कटकारस्थान कायमचे मोडीत काढण्यात येईल,’’ असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पिंपरीत दिला. 

येथील एच. ए. मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निर्धार सभा आणि महाअधिवेशन घेण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड. आंबेडकर बोलत होते. आमदार इम्तियाज जलील, माजी आमदार लक्ष्मण माने, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, अकील मुजावर, प्रताप गुरव आदी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘‘देशातील गरिबांच्या हाताला काम न देता व्यवस्था बिघडविण्याचे काम सध्या सुरू आहे. देशात सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत समांतर सरकार चालवीत आहेत. या सरकारच्या विरोधात काँग्रेसने पावले उचलली नाहीत. सत्ताधाऱ्यांनी वंचितांचा विचार न केल्याने आता वंचित समाजघटक उठाव करीत आहे.

प्रतिष्ठा, अधिकार, सत्ता आणि विकासापासून त्यांना गेल्या सत्तर वर्षांपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे आता आम्ही आमची मान दुसऱ्याच्या खांद्यावर न ठेवता स्वतःच्याच खांद्यावर ठेवणार आहोत. विविध क्षेत्रांतील खासगीकरणाला आमचा विरोध असणार आहे. राज्यात राहणाऱ्या जाणता राजाला आदिवासींचे कुपोषण दिसत नाही का?’’ 

जलील म्हणाले, ‘‘भाजपप्रणीत सरकारने लोकांना खूप स्वप्ने दाखविली. मात्र, प्रत्यक्षात काय केले, हा विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. सत्ता मिळविणे हा आमचा मूळ उद्देश नसून, भारतीय राज्यघटना वाचविणे हा आहे.’’

माने म्हणाले, ‘‘जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे गाजर जनतेला दाखविण्यात आले आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर खासगीकरण झालेल्या सेवांचे राष्ट्रीयीकरण करण्यात येईल. पिंपरीतील हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्‍स कंपनीतील कामगारांना दोन वर्षे पगार मिळत नसल्याची सध्याची स्थिती आहे. हा कारखाना जर बंद केला गेला तर कामगार लढ्यासाठी रस्त्यावर उतरतील.’’  

राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी ही मूलभूत अधिकार म्हणून करावी, अशा आशयाचा ठराव माजी आमदार लक्ष्मण माने यांनी या वेळी मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. 

सरकारकडून सध्या आरक्षण देऊन लोकांमध्ये असलेली चीड थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे. आरक्षणाने विद्रोह शमणार नाही. देशातील मतभेद व द्वेषाचे राजकारण संपवले पाहिजे.
- ॲड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com