
प्रसाद आणि अनिकेत या दोघांचाही लष्करात दाखल होण्याचा प्रवास राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मधून झाला.
पुणे : लष्कराच्या दोन प्रशिक्षण संस्थेतून तब्बल चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत पुण्यातील दोन तरुण लष्करातील सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले आहेत. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमीच्या (आयएमए) 147 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन सोहळा नुकताच संपन्न झाला असून प्रसाद कोहिनकर आणि अनिकेत साठे यांच्या यशाने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रसाद आणि अनिकेत या दोघांचाही लष्करात दाखल होण्याचा प्रवास राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मधून झाला. तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करत दोघांनीही सैन्यदलात जाण्यासाठी आयएमए या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळविला. येथे एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. दोघेही आपापल्या कुटुंबातील पहिले सदस्य आहेत, ज्यांनी लष्करात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.
- पुण्याच्या सुशांत जाधवची 'फ्लायिंग ऑफिसर'पदी निवड; संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
प्रसादचे वडील बाळकृष्ण कोहिनकर व्यावसायिक असून त्याची आई मंगल कोहिनकर गृहिणी आहे. प्रसादने लहानपणापासूनच लष्करात जाण्याची जिद्द असल्याने त्याने एनडीएसाठी तयारी करण्यास सुरवात केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्याने एनडीएमध्ये प्रवेश मिळविला. तसेच आयएमएमधील एक वर्षाच्या प्रशिक्षण काळात त्याने आर्मी एव्हिएशन विभागात चांगली कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे. नाशिकच्या आर्मी एव्हिएशन स्कूलमधून तो पुढील दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत होणार आहे.
अनिकेतचा प्रवास अत्यंत चढ-उताराचा ठरला. एनडीएच्या प्रशिक्षणादरम्यान त्याचे वडील अमरेंद्र साठे यांचे निधन झाले होते. तरीही खचून न जाता परिस्थितीवर मात करीत त्याने लेफ्टनंट पदापर्यंत वाटचाल करीत एक नवा आदर्श निर्माण केल्याचे त्याची आई अनुजा साठे यांनी सांगितले.
- भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा
"लहानपणापासूनच मला साहसी कृत्यांची आवड होती आणि त्यासाठी सैन्यदलात जाण्याचे ठरविले. त्यामुळे खासगी क्षेत्रात करिअरचा विचार कधीच केला नाही. मात्र प्रशिक्षणा दरम्यान जाणवले की राज्यातील तरुण फार कमी संख्येने या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहतात. जास्तीत जास्त तरुणांनी लष्करात जाण्याचा कल वाढवावा. यामुळे लष्कराची ताकद आणखीन वाढेल.''
- प्रसाद कोहिनकर
"शाळेत असताना एका चित्रपटातून मला लष्करात जाण्याची प्रेरणा मिळाली. लष्करात जाण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. हे क्षेत्र तरुणांसाठी नक्कीच चांगले असून यामध्ये विविध संधी त्यांना उपलब्ध होऊ शकतात.''
- अनिकेत साठे
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)