पाण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा प्रवीण मानेंचा इशारा

राजकुमार थोरात
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

वालचंदनगर : उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या पाण्यातील १.९७ टीएमसी पाणी, व प्रस्तावित लाकडी -निंबोडी उपसा सिंचन योजनेचे ०.३३ टीएमसी पाणी असे २.३३ टीएमसी पाणी कमी करुन मंगळवेढा उपसा सिंचन योजना व  सोलापूर जिल्हामध्ये इतर ठिकाणी वळविण्याच्या हालचाली वेगाने सुरु झाल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वालचंदनगर : उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या पाण्यातील १.९७ टीएमसी पाणी, व प्रस्तावित लाकडी -निंबोडी उपसा सिंचन योजनेचे ०.३३ टीएमसी पाणी असे २.३३ टीएमसी पाणी कमी करुन मंगळवेढा उपसा सिंचन योजना व  सोलापूर जिल्हामध्ये इतर ठिकाणी वळविण्याच्या हालचाली वेगाने सुरु झाल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

उजनी धरणाचा पाणीसाठा ११७.२३ टीएमसी इतका असून, यातील उपयुक्त पाणी ५३.६६ टीएमसी व मृत पाणी साठा ६३.६६ टीएमसी आहे. सध्या धरणातील ९.६ टीएमसी पाणी खासगी उपसा क्षेत्रासाठी राखीव असून, शेतकरी उजनीमधून विद्युत पंपाने उपसा करुन सुमारे ३४ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती करीत आहेत. तसेच प्रस्ताविक लाकडी -निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, यातील ०.३३ टीएमसी पाणी कमी करुन तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे शेतीचे राखीव १.९७ टीएमसी पाणी करुन मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी १.०१ टीएमसी व सिना -माढा उपसा सिंचन योजनेसाठी ४.५० ऐवजी  ४.७५ टीएमसी पाणी व सोलापूरच्या औद्योगिक वापरासाठी २.१५ टीएमसीऐवजी ३.२६ टीएमसी पाणी देण्याचा प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी देण्यात आली आहे. शासनाकडे तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या मंजुरीसाठी ३ आॅगस्ट २०१८ च्या पत्राद्वारे पाठविण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

इंदापूर ते दौंड तालुक्यापर्यंत उजनीच्या दोन्ही बाजूने अनेक गावातील पाणी योजना व शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाणी योजना अाहेत. सध्या या योजनांसाठी पाणी अपुरे पडत असून, शासनाने उजनीचे राखीव पाणी ९.६ टीएमसीवरुन १२ टीएमसी वाढविण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यासह झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केली आहे.  

सोलापूरचे भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उजनीवर तात्पुरत्या स्वरूपात परवानगी असलेले व बंद योजनांचे पाणी कमी करण्याचा प्रस्ताव असून, हे पाणी प्रवाही क्षेत्रासाठी वापरण्यात येणार असल्याचा प्रस्ताव  तयार करुन मंजूरसाठी पाठविला आहे. 

२.३३ टीएमसी पाण्यासाठी जनआंदोलन उभारणार : प्रवीण माने

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३४ हजार एकरापेक्षा जास्त जमीन कवडीमोल दराने उजनी धरणाच्या निर्मितीसाठी दिली होती. उजनीच्या काठच्या ५२ गावातील शेतकरी स्वखर्चाने पाण्याचा उपसा करुन शेती करीत आहेत.

मात्र, प्रशासनाने उजनीचे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे राखीव पाणी दुसऱ्या जिल्हाला देऊन उजनीचे वाळवंट करण्याचा व तालुक्यातील शेतकऱ्यांना देशाेधडीला लावण्याचा डाव आखला आहे. सदरचा डाव  आम्ही यशस्वी होऊ देणार नसून, या निर्णयाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिला आहे.

Web Title: Praveen Mane give Warning to raise mass movement for water