नाट्यवेड्या शिक्षकाचं "आयतं पोयतं सख्यानं' 

पीतांबर लोहार
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

राज्यात अनेक बोली बोलल्या जात असून, मराठी भाषेचे सौंदर्य त्या वाढवत आहेत. नाटक व एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून अहिराणी संस्कृती जतन करण्याचा आणि मराठी भाषेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. 
- प्रवीण माळी, एकपात्री कलाकार

पिंपरी - सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा लग्नकार्यात म्हटली जाणारी गाणी ऐकत ऐकत मोठा झाला..., शाळा-महाविद्यालयांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात छोट्या-मोठ्या भूमिका साकारू लागला..., शाब्दिक कोट्या करू लागला..., नाट्यवेडाने झपाटून गेला..., "वऱ्हाड निघालंय लंडनला' या एकपात्री प्रयोगाचे कर्ते प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या सहवासात आला... त्यांचा आशीर्वाद लाभला... एकपात्री प्रयोगाने झपाटून गेला... तो एकपात्री प्रयोग म्हणजे "आयतं पोयतं सख्यानं' आणि सादरकर्ते आहेत जळगाव जिल्हा परिषदेच्या अंबाडे (ता. चोपडा) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रवीण माळी. 

पिंपरी-चिंचवडमधील अहिराणी कस्तुरी परिवाराने आयतं पोयतं सख्यानं हा एकपात्री प्रयोग चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केला होता. प्रवीण माळी यांचा हा 121 प्रयोग झाला. त्या वेळी त्यांच्याशी साधलेला संवाद "सकाळ'च्या वाचकांशी शब्दबद्ध केला आहे. हॅलो एव्हरी बडी... अशा इंग्रजी शब्दांनी माळी यांनी रसिकांचे स्वागत केले. "अवर ब्रदर्स अँड सिस्टर...' असे सांगून हिंदी आणि मराठी भाषेतही त्यांनी निवेदन करून माणसाच्या जीवनातील भाषांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मालवणी, कोकणी, आगरी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, वऱ्हाडी बोलींसह खानदेशातील अहिराणी, तावडी, पावरी, लेवापाटीदारी, भिलाऊ बोलींचा गोडवा मांडून सुरू झाला "आयतं पोयतं सख्यानं' हा अहिराणीतील एकपात्री प्रयोग आणि उसळला हास्यकल्लोळ. 

खानदेशात लग्नकार्यात म्हटल्या जाणाऱ्या पारंपरिक गाण्यांची गुंफण आणि प्रथा-परंपरा मांडण्याचा प्रयत्न माळी यांनी यशस्वीपणे केला आहे. या प्रयोगाचा आस्वाद घेताना प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या "वऱ्हाड निघालंय लंडनला' या एकपात्री प्रयोगाची आठवण होते. 

"आयतं पोयतं...'बाबत माळी म्हणाले, ""लग्न कार्यामध्ये ऐकायला मिळणारी गाणी मनाला उभारी द्यायची. त्यांना शाब्दिक कोट्यांची जोड दिली. अनेक जण खळखळून हसू लागले. बारावीत असताना पंधरा-वीस मिनिटांचा कार्यक्रम केला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही तो आवडला. दरम्यानच्या काळात प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचा सहवास लाभला. "स्वतंत्र प्रयोग कर, छान होईल', असे त्यांनी सुचविले. त्यांच्याच आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रात प्रयोग करतो आहे. यासाठी सुभाष अहिरे सरांनी लेखनासाठी प्रोत्साहन दिले. "आयतं पोयतं...'मध्ये 45 पात्र आहेत. लग्नातील पारंपरिक प्रथा-परंपरांबरोबरच प्रबोधनात्मक संदेश देण्याचा व संस्कृतीतील विकृतीवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे.'' 

राज्यात अनेक बोली बोलल्या जात असून, मराठी भाषेचे सौंदर्य त्या वाढवत आहेत. नाटक व एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून अहिराणी संस्कृती जतन करण्याचा आणि मराठी भाषेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. 
- प्रवीण माळी, एकपात्री कलाकार

Web Title: pravin mali one act play writer