Video : शेतकरीपुत्रांनी काढली ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त 'प्रेम यात्रा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

प्रेमी युगुलांचा आनंद द्विगुणित 
फर्ग्युसन रस्त्यावर ही यात्रा जात असताना पादचारी मार्गावरून जाणाऱ्या प्रेम युगुलांनाही कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनाही अनपेक्षित शुभेच्छा मिळाल्याने सुखद धक्का बसला. अनेकांनी या यात्रेचे क्षण मोबाईलमध्ये टिपले.

पुणे - फेटे घातलेले तरुण... बॅंडवर वाजणारी देशभक्तीसह चित्रपटातील गाणी... अन्‌ रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना गुलाब पुष्पाचे होणारे वाटप... ही काही शोभा यात्रा नव्हती. तर बळिराजाच्या मुलांनी एकत्र येऊन शहरी व ग्रामीण नागरिकांचे संबंध आणखी दृढ व्हावेत, यासाठी काढलेले ‘प्रेम यात्रा’ होती. निमित्त होते ‘व्हॅलेंटाइन डे’चे.

यास विद्यार्थ्यांसह नागरिकांनी प्रतिसाद देत सहभाग घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक ते कृषी महाविद्यालय अशी यात्रा काढली.  पुण्यात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शहरी भागातील लोकांशी त्यांचा संवाद घडावा, एकमेकांबद्दल प्रेम वाढीस लागावे तसेच शेतकऱ्यांच्या गुलाबाची विक्री व्हावी, या उद्देशाने प्रथमच अशी यात्रा आयोजित केली होती. प्रेमाचा संदेश देणाऱ्या या जत्रेत ‘प्रेम यात्रा’ लिहिलेला फलक सर्वांत पुढे होता. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘प्रेम कोणावरही करावे...’, ‘प्यार बाँटते चलो...’ असे फलक घेऊन ‘प्रेम द्या, प्रेम घ्या’ अशा घोषणा दिल्या. पादचारी मार्गावरून चालणारे नागरिक, दुकानदार, वाहनचालक यांना उत्साहाने गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या. त्यास नागरिकांनीही भरभरून पाठिंबा देत स्वागत केले. 

‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर तरुणाईच्या काय आहेत प्रतिक्रिया

सचिन पाटोळे म्हणाले, ‘‘व्हॅलेंटाइन डे हा प्रेम देणे आणि घेण्याचा आहे. यात कसलाही मतभेद केला जाऊ नये. साने गुरुजींचा ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हाच संदेश आम्ही देत आहोत. ही यात्रा शेतकऱ्यांच्या मुलांनी काढली आहे.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोनाली पालखे ही विद्यार्थिनी म्हणाली, ‘‘व्हॅलेंटाइन डेला यात्रा काढण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे समाजामध्ये चांगला संदेश जात असून.’

शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रेम भावना निर्माण व्हावी, व्हॉट्‌सॲपवरून गुलाबाची फुले न पाठवता, प्रत्यक्ष भेटून आपल्या प्रेमीजनांना फुले द्यावीत. यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठ मिळेल, असा या यात्रेचा उद्देश आहे.
- राहुल म्हस्के, आयोजक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prem yatra by farmers son for valentine day