‘प्रीपेड रिक्षा’ला नाही प्रवाशांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

शिवाजीनगर, स्वारगेट येथील कार्यालये बंद; पुणे स्टेशनची सेवा सुरू  
पुणे - प्रवाशांना वाजवी दरात हक्काची व सुरक्षित वाहतूक सेवा मिळण्यासाठी शहरात तीन ठिकाणी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू केली होती. मात्र, त्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट येथील ही सेवा अनेक महिन्यांपासून बंद आहे, तर पुणे रेल्वे स्टेशन सेवेवर कॅब सर्व्हिसचा परिणाम झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

शिवाजीनगर येथील प्रीपेड रिक्षा थांब्याच्या कार्यालयात कचरा साचल्याचे दिसून आले. प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने स्वारगेट येथील प्रीपेड थांब्याचे कार्यालयच गायब झाले आहे. पुणे स्टेशनवर अजूनही प्रीपेड सेवा सुरू असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. काहींच्या म्हणण्यानुसार कॅब सर्व्हिसचा या सेवेवर परिणाम झाला आहे.

तिन्ही ठिकाणी दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होते. त्यांना येथूनच सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोचण्यासाठी प्रीपेड रिक्षा थांब्याची सुविधा वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीने सुरू केली. मात्र, या सेवेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

शिवाजीनगर येथील विक्रेते म्हणाले, ‘‘या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने हा थांबा बंद केला आहे. त्याचा उपयोग आता वाहतूक पोलिस करतात.’’ पुणे स्टेशन येथील रिक्षाचालक कैलास शेवकर म्हणाले, ‘‘शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कॅब सर्व्हिसचा काही अंशी परिणाम या सेवेवर झाला आहे.’’

पुणे रेल्वे स्थानकावरील कार्यालयाचे कर्मचारी राजेश रोकडे म्हणाले, ‘‘हा थांबा २४ तास सुरू असतो. बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांची रिक्षासाठी मागणी असते. त्यामुळे ही सुविधा प्रवाशांना सोईस्कर पडते. रिक्षा नोंदणीचे दहा रुपये आणि मीटरनुसार होणाऱ्या भाड्यावर २० रुपये अधिक आकारले जातात; पण सुरक्षा आणि नियोजित ठिकाणी वेळेवर पोचण्यासाठी प्रवाशांचा सेवेला प्रतिसाद मिळत आहे.’’

Web Title: Prepaid riksala no response from passengers