जाधव, पाटील यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव आणि राजाराम पाटील यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे. तर शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सात अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. जाधव यांना तिसऱ्यांदा, तर पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राजाराम पाटील हे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू आहेत.

पुणे - सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव आणि राजाराम पाटील यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे. तर शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सात अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. जाधव यांना तिसऱ्यांदा, तर पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राजाराम पाटील हे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकातील अतिरिक्त अधीक्षक दिलीप बोरस्ते, जिल्हा पोलिस दलातील उपअधीक्षक राजेंद्र कदम, शहर पोलिस दलातील फौजदार राजेंद्र पोळ, सहायक फौजदार अविनाश मराठे, सहायक फौजदार मनोहर चिंतल्लू, जिल्हा पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सहायक फौजदार दत्तात्रेय जगताप आणि बारामतीमधील पोलिस कर्मचारी बाळासाहेब भोई यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.  

जाधव सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सहायक आयुक्त आहेत. २००१ आणि २००९ मध्येही त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यांनी १६ एन्काउंटर केले आहेत. नालासोपारा येथील शस्त्रसाठा, ठाणे शहरातील तिहेरी खून यांसारख्या गुन्ह्यांची त्यांनी उकल केली. पाटील यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी २००६ मध्ये राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यांनी मुंबई, कोडोली, जयसिंगपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. कोल्हापूर येथे वाहतूक विभागात कार्यरत असताना त्यांनी वाहतूक सिग्नल यंत्रणा सुरू करून वाहतुकीस शिस्त लावली. बोरस्ते यांनी अंजनाबाई गावितचे बालहत्याकांड उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच जैतापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन त्यांनी हाताळले होते. उत्कृष्ट तपासाबाबत त्यांना तीन वेळा महासंचालक पदक जाहीर झाले आहे. लाचलुचत प्रतिबंधक विभागात असताना कदम यांनी ३३ ट्रॅप यशस्वी केले असून, त्यांनी तपास केलेल्या १२ गुन्ह्यांतील आरोपींना जन्मठेप झाली आहे. पुण्यातील दीड कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणला होता. पोळ, मराठे, चिंतल्लू, जगताप, भोई यांच्याही उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Gallantry Medal Declare