esakal | खडी, क्रशसॅण्ड, डबरचे दर वाढले २५ ते ३० टक्क्यांनी
sakal

बोलून बातमी शोधा

खडी, क्रशसॅण्ड, डबरचे दर वाढले २५ ते ३० टक्क्यांनी

खडी, क्रशसॅण्ड, डबरचे दर वाढले २५ ते ३० टक्क्यांनी

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : राज्य सरकारने एक जुलै पासून गौण खनिजच्या स्वामित्व(रॉयल्टी) दरात वाढ केली आहे. या व्यवसायातील डिझेलसह अनेक गोष्टीमध्ये दरवाढ झाल्याने खडी, क्रशसॅण्ड, डबरच्या दरात सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती खाण व क्रशर उद्योजकानी ‘सकाळ’ शी बोलताना दिली आहे.

याबाबत, नांदोशी, धायरी, जांभूळवाडी, आंबेगाव, कात्रज, वडाचीवाडी येथील खाण उद्योजक यांच्या शिवछत्रपती खाण मालक चालक संघटनेची आज बैठक झाली. यावेळी अध्यक्ष नितीन दांगट पाटील, सचिव सुनील महाजन, युवराज फेन्गासे, सुनील मांगडे, विजय कोल्हे, बापूसाहेब पोकळे, सोमेश्वर वाघचौरे, नितीन घुले, रोहन तापकीर, शंकर किवळे, बाळा मांगडे, समीर पिंपळे, विकास कामठे, करण कुसाळकर, चंद्रकांत पोकळे, दत्तात्रेय ठाकर पाटील, प्रदीप रामदास हे उद्योजक उपस्थित होते.

हेही वाचा: 28 प्रवाशांना घेऊन जाणारे रशियाचे विमान पाण्यात कोसळले

सध्या बांधकामात आरसीसी काँक्रीटचा वापर वाढला. यासाठी खडी, क्रशसॅण्ड, डबर वापरले जाते. खाण व क्रशर उद्योगात २०११ -२०१२ नंतर दरवाढ झाली नव्हती. जीएसटीसह अन्य मूलभूत वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्याचा परिणाम बांधकामासाठी आवश्यक असलेल्या खडी, क्रशसॅण्ड, डबरच्या दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढ करण्याचे ठरले.

राज्य सरकारने एक जुलै पासून खडी, क्रशसॅण्ड व डबरच्या गौणखनिज स्वामित्व(रॉयल्टी) दरात प्रतिब्रास ४०० रुपयांवरून प्रतिब्रास ६०० रुपयांपर्यंत वाढ घोषित केली आहे. जीएसटी, टीसीएस यामध्येही भरमसाठ वाढ होऊन स्वामित्व(रॉयल्टी) दर सर्व करांसह प्रतिब्रास ८०० रुपये झाला आहे. डिझेलचा दर ६० रुपयांवरून ९५ रुपये प्रतिलिटर झाला. डंपर, ट्रकची किंमत चार वर्षांपूर्वी २८लाख रुपये होती. त्याची सध्या किंमत ४२ लाख झाली आहे. ट्रक टायरची जोडी ३५ हजार होती आता ४५ हजार पर्यत वाढली. परिणामी वाहतूक खर्चात देखील दरवाढ झाली आहे. स्टोन क्रशरच्या व गाड्यांच्या मेन्टेनन्ससाठी लागणारे सर्व लोखंड, स्टीलचे दर प्रतिकिलो दुप्पट झालेत. सर्व स्पेअर्स पार्ट व मेन्टेनन्स खर्चात भरमसाठ वाढले. विजेच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढलेत. कामगार व मजुरांची रोजंदारी ३० टक्केने वाढली. खडी, क्रशसॅण्ड, डबर पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांनी एक जुलैपासून सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी म्हणजे प्रतिब्रास ४०० रुपयांप्रमाणे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीचा फटका बांधकाम व्यावसायिकांसह स्वतात घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना बसणार आहे.

हेही वाचा: एजाजचा जामीन फेटाळला, ड्रग्ज प्रकरणी अटकेत

“खडी, क्रशसॅण्ड पुरवठा करणाऱ्या सर्वच व्यावसायिकांनी मागील दहा वर्षात कोणतीही दरवाढ केली नाही. बांधकाम व्यावसायिक व घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या बिलांना आम्ही सहकार्य केले. परंतु, प्रत्येक गोष्टीत दरवाढ झाली आहे. मागील वर्षात लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाला. यामुळे दरवाढ करावी लागत आहे.”

-नितीन दांगट पाटील, अध्यक्ष, शिवछत्रपती खाण मालक चालक संघटना

loading image