प्राथमिक शिक्षकांची संपात उडी; संपाची तीव्रता वाढली

संतोष शेंडकर
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

बारामती तालुक्यात तर तब्बल नव्वद टक्केपेक्षा जास्त शाळा बंद होत्या. तोडगा न निघाल्यास बुधवारी आणि गुरूवारीही शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.

सोमेश्वरनगर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात प्राथमिक शिक्षक संघासह प्राथमिक शिक्षकांच्या सर्वच संघटना उतरल्या आहेत. स्वतःच्या मागण्याही या आंदोलनात पुढे रेटल्या आहेत. यामुळे संपाची तीव्रता वाढली असून पुणे जिल्ह्यातील असंख्य शाळा आज बंद होत्या. बारामती तालुक्यात तर तब्बल नव्वद टक्केपेक्षा जास्त शाळा बंद होत्या. तोडगा न निघाल्यास बुधवारी आणि गुरूवारीही शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.

सातवा वेतन आयोग मिळावा, चौदा महिन्यांचा फरक मिळावा, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, अशा मागण्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. शिक्षक संघटनांनी ऐनवेळी या संपात उडी घेतल्याने शहरांपुरती मर्यादित राहणाऱ्या या संपाची तीव्रता गावोगाव पोचली आहे. राज्यातील सर्वात मोठी शिक्षक संघटना मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या आंदोलनास पाठींबा दिला आहे. याशिवाय प्राथमिक शिक्षक समितीसह अन्य संघटनाही संपात उतरल्या आहेत. आज शंभर पटाच्या शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक द्या, पदवीधरांना विनाअट वेतनश्रेणी द्या, बीएलओसह अशैक्षणिक कामांतून मुक्तता करा, पदोन्नतीतून केंद्रप्रमुखांची पदे भरा, ऑनलाईन कामांतून मुक्तता करा, शाळांना पाणी व वीज मोफत द्या, अशा मागण्या शिक्षकांनी पुढे केल्या आहेत. जिल्ह्यातील काही शाळा सकाळी नियमितपणे सुरू झाल्या. परंतु शिक्षक संपात उतरल्याची माहिती पसरताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परत पाठवत शाळांना कुलूप ठोकले. बारामती तालुका याबाबत आघाडीवर राहिला. तालुक्यात 798 पैकी तब्बल 712 शिक्षक संपावर गेले होते. यामुळे नव्वद टक्केपेक्षा जास्त शाळांमध्ये दुपारी बारानंतर शुकशुकाट पसरला होता. 

दरम्यान, शिक्षकांनी या संपात उडी घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. आज सकाळी पालकांना कल्पना नसतानाच शाळा बंद झाल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. संपाचे दिवस पुन्हा भरून काढले जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तर तिन्ही दिवस शाळा बंद -
सरकारी कर्मचाऱ्यांच्या व विशेषतः शिक्षकांच्या प्रश्नांविषयी सरकार उदासिन असल्याने आणि सतत निघणाऱ्या तुघलकी फतव्याने शिक्षण क्षेत्रात असंतोष पसरला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संख्येने सर्वात जास्त शिक्षकच आहेत. त्यामुळे संपाची धार वाढली असून सरकारने त्वरीत तोडगा न काढल्यास तिन्ही दिवस संपात सहभागी होणार आहोत, अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Primary Teachers Strike At Someshwarnagar Pune