थेट थोरल्या पवारांशी टक्कर घेतलेले पृथ्वीराज...  

pruthiraj jachak
pruthiraj jachak

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर आजपासून (ता. ३) एकत्र काम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सभासदामंधून कौतुक होत असून, जाचक यांनी समाजकारण व राजकारणामध्ये संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी तत्वाशी कधीच तडजोड केलेली नाही. त्यामुळे कारखान्याच्या परिसरामध्ये त्यांची वेगळीच ओळख आहे.

नीरा खोऱ्यातील महत्वाच्या सहकारी कारखान्यामध्ये भवानीनगरच्या सहकारी साखर कारखान्याचा समावेश होतो. कारखान्यावर बारामती व इंदापूर तालुक्यातील सुमारे २५ हजारांपेक्षा जास्त सभासदांचे संसार चालत आहेत. कारखान्याच्या सभासदांचा आवाज संपूर्ण राज्यभर दुमदुमतो. गेल्या काही वर्षांपासून कारखाना अडचणीमध्ये चालत आहे. जाचक हे शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून कारखान्याच्या सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी लढत होते. त्यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. सन १९९२ मध्ये संचालक झालेल्या जाचक यांनी सन १९९५ मध्ये कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. त्यानंतर सन २००३ पर्यंत ते कारखान्याचे अध्यक्ष होते. तसेच, साखर संघाचे उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 

दरम्यान, सन २००३ मध्ये साखर संघाच्या अध्यक्षपदाचा स्वत: राजीनामा दिला होता. त्यानंतर सन २००४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते शरद पवार यांच्या विरोधामध्ये भाजपमधून निवडणूक लढले. तेव्हापासून त्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ते राष्ट्रवादीमध्ये स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून या चर्चा बंद झाल्या होत्या. आज रक्षाबंधनाच्या मुर्हूतावर बारामतीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी पुढाकार घेऊन जाचक व शरद पवार यांची भेट घडवून आणली. ही नुसती भेटच नव्हती, तर सुमारे दीड तासाची डिनर डिप्लोमासीही झाली. मुंबईमध्ये शरद पवार यांच्या सिल्वहर ओक या निवासस्थानात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जाचक यांचे पुत्र व उद्योजक कुणाल जाचक हेही उपस्थित होते. 

ऐकेकाळी शरद पवार यांच्या विरोधामध्ये लोकसभेची निवडणूक लढविणारे जाचक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पवारसाहेबांबरोबर नव्या जोमाने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सभासदामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आजच्या बैठकीविषयी गुजर यांनी सांगितले की, आजची बैठक ही नियोजित बैठक होती. सभासदांच्या व कारखान्याच्या हितासाठी पृथ्वीराज जाचक यांनी पवारसाहेबांसोबत काम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

कारखान्याचे व सभासदांचे हित जोपासणारा अवलिया...
साखर कारखान्यातील व सहकारामधील गाढा अभ्यासक असलेले पृथ्वीराज जाचक यांनी संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही. सन २०१५ च्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये स्वतंत्र पॅनेल केला होता. निवडणूकपूर्वीत्यांनी कारखान्याला सलग तीन ते पाच वर्षे ऊस पुरवठा न करणाऱ्या व कारखान्याची थकबाकी थकविणाऱ्या सभासदांना मतदानाचा हक्क देण्यात येऊ नये, यासाठी  न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यातून कारखान्याच्या निम्म्या सभासदांच्या विरोधात ते संस्थेच्या हितासाठी न्यायालयामध्ये गेले होते. न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर आपला सहज पराभव होईल, हे त्यांना माहित होते. मात्र, तरीही त्यांनी तत्वाशी तडजोड केली नाही. मार्च २०२० मध्ये त्यांनी पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेतली होती. ते संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी तत्वाशी तडजोड करीत नाहीत, अशी त्यांची ओळख आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com