#BusStopIssue खासगी बसथांब्यांसाठी थांबाच!

Private  BusStop Issue in pune
Private BusStop Issue in pune

पुणे - खासगी बसने शहरातून बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून, या बससाठी शहराच्या विविध भागांत १९ थांबे (पिकअप पॉइंट) निश्‍चित केले असले, तरी त्याबाबतचा अंतिम आदेश काढण्यास महापालिकेला चार वर्षांपासून वेळ मिळालेला नाही. विशेष म्हणजे महापालिका, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी एकत्र येऊन हे १९ ‘पिकअप पॉइंट’ निश्‍चित केले आहेत.

राज्यात आणि राज्याबाहेरील विविध मार्गांवर खासगी प्रवासी बसद्वारे शहरातून रोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वाहतूक होते. खासगी बसला शहरात वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी थांबे देण्यात यावेत, असा निर्णय १३ सप्टेंबर २०१० रोजी झाला आहे. तत्कालीन आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर, पोलिस, महापालिका आणि ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांचा त्यात सहभाग होता. त्या वेळी झालेल्या चर्चेनुसार वाहतूक शाखेतील तत्कालीन निरीक्षक रंगराज कामिरे, आरटीओ निरीक्षक आर. एस. कन्हेरकर आणि महापालिकेच्या अतिरिक्त नगर अभियंता (प्रकल्प) कार्यालयातील कार्यकारी अभियंता एन. डी. गंभीरे यांच्या समितीने शहरातील १९ थांबे निश्‍चित केले. 

हे सर्व थांबे एसटी बस स्थानकांपासून सुमारे २०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत. समितीने निश्‍चित केलेल्या पॉइंटनुसार अंतिम आदेश काढून अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. परंतु, त्याकडे संबंधित अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांचे दुर्लक्ष झाले.

वाहतूक शाखेत नवा उपायुक्त आला, की नवे आदेश काढले जातात. त्यानुसार गेल्या वर्षी तत्कालीन उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी खासगी प्रवासी बसला शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. परंतु, याबाबत प्रवाशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यामुळे पोलिसांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. मात्र, थांबे निश्‍चित करण्याच्या बसचालकांच्या मागणीकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शहरातील बाह्यवळण रस्त्यांवर वाहतूक पोलिस विविध नियमांचा आधार घेत बसवर कारवाई करीत आहेत. कात्रज परिसरात पहाटे पाच वाजता आणि रात्री साडेनऊनंतरही वाहतूक पोलिस कारवाई करण्यासाठी ‘तत्पर’ असतात, असे नुकतेच उघड झाले आहे. 

खासगी बसला पिकअप पॉइंट देण्याबाबत महापालिका, आरटीओ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. बसमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, याची दक्षता घ्यावी लागेल. एकंदरीत, नागरिकांच्या हिताचा जो निर्णय असेल, तो घेतला जाईल.
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त
 

पिकअप पॉइंट देण्यास न्यायालयानेही पोलिस, महापालिकेला सांगितले आहे. गेल्या आठ वर्षांपासून हा प्रश्‍न प्रलंबित आहे. बस व्यवसाय कायदेशीर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी बस व्यावसायिकांना पिकअप पॉइंट मिळाले पाहिजेत.
- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, प्रवासी बस असोसिएशन

येथे होते वाहतूक
बंगळूर, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, इंदूर, जोधपूर, बेळगाव तसेच नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, भुसावळ, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, मालवण, चिपळूण.

 ८०० ते १२००   - शहरातून रोजच्या बसची संख्या 
 ४० ते ५० हजार  - रोजचे प्रवासी

शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची खासगी बसची आवश्‍यकता, या दोन्हींचा विचार करून पिकअप पॉइंटबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. त्यासाठी संबंधित यंत्रणांची स्वतंत्र बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर करू.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com