माझी चौकशी कायद्याच्या चौकटीतच : भुजबळ

दत्ता म्हसकर
सोमवार, 30 एप्रिल 2018

'श्री शिवछत्रपती महाविद्यालाय ' हे जुन्नरचे भूषण आहे. कॉलेजला बदनाम करण्याचा माझा हेतू नाही.  मी कायद्याच्या चौकटीतच चौकशी केली.चौकशी कामी  कॉलेज प्रशासन सहकार्य करत नाही. मी माझी चौकशी सुरू ठेवणार…
- के डी भुजबळ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जुन्नर.

जुन्नर : जुन्नरला श्री शिवछत्रपती कनिष्ठ महाविद्यालयात सुरू असलेले खासगी क्लासेसची तपासणी केल्याबाबत संस्थेने केलेल्या आरोपाबद्दल बोलताना गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ म्हणाले, मला कोणत्याही शाळेला भेट देण्याचा आणि शाळेत प्रवेश करण्याचा व तपासण्याचा अधिकार आहे. विना अनुदानित तुकड्यावरील फी ठरविण्यासाठी असलेल्या कायद्याचे पालन झाले पाहिजे. पालकांना व संस्थेला तो अधिकार नाही. 

मुलांना प्रश्न विचारून क्लास नेमका कशाचा आहे? आणि त्याची फी किती घेतली जाते? हे जाणून घेण्याचा अधिकार गट शिक्षणाधिकारी म्हणून मला आहे. माझ्याबरोबर आणखी चार सहकारी होते. मुलांशी बोलताना शिक्षिका समोर नको म्हणून त्यांना थोडावेळ तुम्ही बाहेर थांबा, मला मुलांशी बोलायचे असे म्हणालो हे गैरवर्तन होत नाही. अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी फुकट शिकवतो असे कॉलेजचे म्हणणे असेल तर आदिवासी विभागाकडे फी परतावा प्रस्ताव कशासाठी पाठविला ? याचा खुलासा होणे गरजेचे आहे. यावेळी 120 आदिवासी मुले क्लास मध्ये आढळली नाहीत.

चौकशीत कॉलेज निर्दोष असेल तर निर्दोष असल्याचा अहवाल जाईल पण चौकशीलाच विरोध ही प्रशासनाची भूमिका योग्य नाही. कोटा पॅटर्नला शासनाची परवानगी नाही. इयत्ता 1 ली ते 12 वी चे शिक्षणाबाबत कामकाज गटशिक्षणाधिकारी पाहतात. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करून यापूर्वी अहवाल वरिष्ठांना पाठविले आहेत.

फी कोणत्या कायद्याने व कशी निश्चित केली जाते हे संस्थेला माहीत पाहिजे. कोटा पॅटर्नच्या नावाखाली बाहेरील मुलांनी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलाय आणि प्रतीवर्षं 80,000/- फी भरल्याची कबुली दिलीय. कॉलेज प्रशासनाने हे नाकारले असले तरी पालक खोटे बोलत नाहीत.

नियमित 12 वी त आलेल्या मुलांचा क्लास सुरू झालाय. याला सुट्टीतील पण म्हणता येत नाही कारण शाळा 1 मे पर्यंत सुरूच असतात. कॉलेजने चौकशीला सामोरे जावं आणि आपण खरच निर्दोष, प्रामाणिक असल्याचं सिद्ध करावं. बातमी आल्यानंतर दखल घेणं हे माझं काम आहे.माझ्याकडे या प्रकरणी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक दोघांकडूनही संदेश आले असून शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास आणून मी काम सुरू केले आहे. त्याच दिवशी माझा अहवाल वरिष्ठांना गेला आहे.तसेच फोनवरून मार्गदर्शन घेऊनच कार्यवाही करीत आहे. 

'श्री शिवछत्रपती महाविद्यालाय ' हे जुन्नरचे भूषण आहे. कॉलेजला बदनाम करण्याचा माझा हेतू नाही.  मी कायद्याच्या चौकटीतच चौकशी केली.चौकशी कामी  कॉलेज प्रशासन सहकार्य करत नाही. मी माझी चौकशी सुरू ठेवणार…
- के डी भुजबळ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जुन्नर.

Web Title: private classes in Junnar