esakal | कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी खासगी डॉक्टर आले पुढे

बोलून बातमी शोधा

Covid care center

कोरोनाची साथ वाढल्यानंतर महापालिकेच्या वतीने सुमारे ४० हजार रुग्णांच्या सोयीचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते.

कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी खासगी डॉक्टर आले पुढे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी दीडशेहून अधिक खासगी डॉक्टर पुढे आले आहेत. परिणामी, रुग्णांना घराजवळ उपचार व्यवस्था पुरविण्याच्या महापालिकेच्या योजनेला बळ मिळाले असून, या डॉक्टरांच्या मदतीने गरजू रुग्णांना मोफत आणि काही ठिकाणी सरकारी दरात उपचार उपलब्ध होणार आहेत.

कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असतानाच आरोग्य यंत्रणा अपुरी ठरत आहे. त्यात कोरोना संसर्गाची साखळी तुटत नसल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. ही बाब गांभीर्याने घेत प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार देण्यासाठी ज्या भागात किमान सुविधा उपलब्ध होतील, त्यासाठी खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यातून ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी डॉक्टरांनी एकत्र येऊन कोविड सेंटर सुरू करावेत, त्याकरिता महापालिका मदत करेल, असे महापालिकेने जाहीर केले. त्याबाबतचे वृत्त सोमवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर विविध भागांतील डॉक्टर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन चर्चा केली.

हेही वाचा: Corona : पुण्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले; दिवसभरात साडेदहा हजार कोरोनामुक्त

कोरोनाची साथ वाढल्यानंतर महापालिकेच्या वतीने सुमारे ४० हजार रुग्णांच्या सोयीचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, रुग्ण कमी होताच त्यातील काही सेंटरही बंद करण्यात आले होते. तर काही सेंटर उघडलेही नव्हते. परंतु, आता नव्याने कोविड सेंटरसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास ‘सीसीसी’मध्येही नवी उपचार व्यवस्था करता येणार आहे.

- राजेंद्र मुठे, प्रमुख, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग, महापालिका

येथे देणार प्राधान्य

खासगी डॉक्टरांची मदतीने काही कोविड सेंटर सुरू करता येणार आहेत. तर, या डॉक्टरांकडील काही सुविधांचा वापर करून त्याच ठिकाणी उपचार व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यवाही करणार आहे. ज्या भागांत महापालिकेची रुग्णालये नाहीत किंवा अन्य कोणतीही उपचाराची सुविधा नाही, अशा भागात हे कोविड सेंटर सुरू करण्यास प्राधान्य आहे.

नियोजित कोविड सेंटरसाठी उपचाराची यंत्रणा पुरविण्यासाठी खासगी डॉक्टरांसोबत करार केले जातील. त्यासाठी आठ डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांची माहिती मागविली आहे.

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, पुणे