खासगी दवाखान्यांतही गोवर, रुबेला लस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे - गोवर आणि रुबेला (एमआर) याची लस आता महापालिकेने खासगी दवाखान्यांमधूनही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शाळेत आणि महापालिकेच्या रुग्णालयामध्ये ही लस न घेतलेल्या मुला-मुलींसाठी हा तिसरा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. 

पुणे - गोवर आणि रुबेला (एमआर) याची लस आता महापालिकेने खासगी दवाखान्यांमधूनही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शाळेत आणि महापालिकेच्या रुग्णालयामध्ये ही लस न घेतलेल्या मुला-मुलींसाठी हा तिसरा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. 

शहरात २७ नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत पुण्यात ८१ टक्के मुला-मुलींना ही लस देण्यात आली आहे. एक महिन्यापासून ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना ही लस देण्याचे आव्हान महापालिकेपुढे होते. त्याच्या सुरवातीच्या टप्प्यात शाळा, अंगणवाड्यांमधून हे लसीकरण यशस्वीपणे करण्यात आले. त्याच वेळी महापालिकेच्या रुग्णालयांमधूनही हे लसीकरण सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे शाळांमधून लसीकरण होत असताना लस न घेता आलेल्या मुलांना यातून पर्याय निर्माण झाला. त्यामुळे ८१ टक्के मुलांना लस देता आली, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आला. 

लसीकरणाची कक्षा विस्तारण्यासाठी आता महापालिकेतर्फे खासगी डॉक्‍टरांची मदत घेण्यात येणार आहे. त्यात बालरोगतज्ज्ञ आणि रुग्णालयांचा समावेश आहे. शहरातील ५३ खासगी डॉक्‍टर आणि रुग्णालयांमध्ये आता गोवर व रुबेलाची लस उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

शहरात मोठ्या प्रमाणात खासगी डॉक्‍टरांकडे वैद्यकीय उपचारांसाठी मुलांना आणले जाते. त्या वेळी मुलाला ही लस देता येईल. त्यासाठी महापालिकेने तेथे व्यवस्था केली आहे. या लसीसाठी शुल्क आकारले जात नाही.
- डॉ. अमित शहा, लसीकरण अधिकारी

Web Title: Private Hospital Govar Rubela Vaccination