अजून किती जीव घेणार?; मंचरजवळील जीवघेणा खासगी प्रवास थांबणार केव्हा !

aouto.jpg
aouto.jpg

निरगुडसर : सद्यःस्थितीत मंचर-रांजणी या रस्त्यावरील आठ गावांच्या प्रवासासाठी एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. काही गावांमधील एसटी सेवाच बंद आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना खासगी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमधून व इतर वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. मात्र, अशा प्रकारचा खासगी वाहनांमधील प्रवास जीवघेणा ठरत आहे.

दरम्यान, या धोकादायक प्रवासात आजतागायत आठ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारची अवैध वाहतूक, वाहनांचा वाढलेला वेग, ड्रिंक ऍण्ड ड्राइव्ह, विविध नियमांची होणारी पायमल्ली यावर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होणार तरी कधी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

मंचर-बेल्हे रस्त्यावर चांडोली खुर्द, चांडोली बुद्रुक, खडकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, वळती, नागापूर ही आठ गावे आहेत. मंचर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना तर शेती व्यावसायिक, नोकरदारांना मंचरला यावे लागते. पुढे काहींना पुणे, खेड, नारायणगाव, आळेफाटा या ठिकाणी नोकरी, शिक्षणासाठी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर एसटी सेवेची अधिक गरज भासते; परंतु एसटीच्या कमी असलेल्या फेऱ्या, तसेच काही गावात एसटी सेवाच बंद असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहतूक करणाऱ्या गाडीने प्रवास करावा लागतो. मात्र, हा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे.

सुसाट गाड्या - 
सध्या या रस्त्यांवर दुचाकी गाडीसह चारचाकी गाड्यांचा वेग अधिक वाढला आहे. त्यामध्ये पिकअप गाडीचा वेग तर अमर्यादित झालेला आहे. तालुक्‍याच्या पूर्व भागात भाजीपाल्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यांच्या विक्रीसाठी वाहतूक करण्यासाठी पिकअपचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच मांजरवाडीमार्गे नारायणगावकडे जाणाऱ्या पिकअपचा वेग जास्त असतो. अशा गाड्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच या रस्त्यावर काही तरुण मुले दुचाकी बेफाम चालवितात. यातील काही मुलांकडे वाहन परवाना नसतो, तर काही अल्पवयीन असूनदेखील वाहन चालवितात. अशा प्रकारे वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासन कारवाई करणार तरी कधी? हा सवाल उपस्थित होत आहे. 

तीन वर्षांत आठ जणांचा मृत्यू - 
मंचर-रांजणी रस्त्यावरील थोरांदळेनजीक खासगी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा व पिकअपचा अपघात होऊन गुरुवारी सायंकाळी आजी नातवांसह एक तरुणी अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एका तरुणीचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. अशा प्रकारे या मार्गावर तीन वर्षांत आठहून अधिक झालेले अपघात विशेष म्हणजे हे खासगी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचेच झाले आहेत. त्यामध्ये आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशी धोकादायक वाहतूक बंद करण्याची मागणी रांजणी-थोरांदळे जाधववाडी ग्रामस्थांनी मंचर पोलिसांना निवेदन देऊन केली आहे. 

नियमांची पायमल्ली- 
आंबेगाव तालुक्‍यात मंचर-रांजणी मार्गावर नव्हे, तर मंचर-अवसरी-पारगाव, मंचर-घोडेगाव मंचर-कळंब, मंचर-पिंपळगाव, मंचर-पेठ या मार्गावरदेखील अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. या मार्गावरदेखील परमीट सहा प्रवाशांचे असूनदेखील दुप्पट प्रवासी बकऱ्यांप्रमाणे भरले जात आहेत. काही वाहनचालक दारूच्या नशेतदेखील गाडी चालवतात. अशा प्रकारे होणाऱ्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. मंचर-रांजणी मार्गावरील रिक्षा वाहतूक तर पोलिसांनी पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी होत आहे. 

एसटीच्या फेऱ्या वाढवा- 
सकाळची मंचरकडे जाणारी मंचर-भागडी, संध्याकाळची नागापूरकडे जाणारी मंचर-नागापूर या गाड्या बंद झाल्या आहेत, तर सायंकाळी पुण्याहून पिंपरखेडकडे जाणारी गाडी क्षमतेपेक्षा अधिक भरत असल्याने विद्यार्थ्यांना खासगी गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बंद झालेल्या एसटी पूर्ववत सुरू करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत एसटी सेवा सुरू करण्याची मागणी रांजणी, थोरांदळे जाधववाडी ग्रामस्थांनी केली आहे. 

"फोटो काढा, कारवाई करू' 
मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे अवैध वाहतुकीबाबत म्हणाले की, ""मंचरकडून विविध गावांकडील होणारी अवैध प्रवासी वाहतूक शुक्रवारपासून बंद करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी अवैध वाहतूक दिसेल त्या ठिकाणावरील गाडीचा वाहन क्रमांकासह फोटो काढा, त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com