धमाल गोष्टींना आता आधुनिकतेचा साज!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे - ससा-कासव... जेम्स बाँड... म्हातारीचा भोपळा अन्‌ राजा-राणी... या गोष्टी आपण आजी-आजोबांकडून ऐकायचो. गोष्ट ऐकता ऐकताच झोप लागायची. बाळगोपाळांच्या भावविश्‍वाला गोष्टींच्या माध्यमातून नवा रंग देण्याचे काम प्रोफेशनल स्टोरी टेलर्स (कथा सांगणारे) करीत आहेत.

कथावाचनाला साभिनयाची जोड देत हे स्टोरी टेलर्स मुलांना कथानकाची सफर घडवीत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीला कथांची सफर घडवून आणण्याचे स्टोरी टेलर्सनी नियोजन केले आहे. 

पुणे - ससा-कासव... जेम्स बाँड... म्हातारीचा भोपळा अन्‌ राजा-राणी... या गोष्टी आपण आजी-आजोबांकडून ऐकायचो. गोष्ट ऐकता ऐकताच झोप लागायची. बाळगोपाळांच्या भावविश्‍वाला गोष्टींच्या माध्यमातून नवा रंग देण्याचे काम प्रोफेशनल स्टोरी टेलर्स (कथा सांगणारे) करीत आहेत.

कथावाचनाला साभिनयाची जोड देत हे स्टोरी टेलर्स मुलांना कथानकाची सफर घडवीत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीला कथांची सफर घडवून आणण्याचे स्टोरी टेलर्सनी नियोजन केले आहे. 

पूर्वी आजी-आजोबांच्या कथेच्या विश्‍वात मुले रमायची. पण, आता पुस्तकांतील कथांचे जग स्टोरी टेलर्स प्रत्यक्षरीत्या उलगडत आहे. स्टोरी टेलिंग फेस्टिव्हलसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून स्टोरी टेलर्स कथा सांगताना दिसत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत ३ ते १४ वयोगटातील मुलांना या नव्या रूपात गोष्टी ऐकायला मिळणार आहेत.

सोशल मीडियावरही गोष्टी 
स्टोरी टेलर्सकडून ऐकविल्या जाणाऱ्या कथा केवळ फेस्टिव्हल किंवा कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळत नाहीत. तर, स्टोरी टेलर्सच्या अधिकृत संकेतस्थळांसह फेसबुक-इन्स्टाग्राम पेज आणि यू-ट्यूबवरही व्हिडिओच्या माध्यमातून या कथा ऐकायला मिळतात. कथावाचनाचे हे व्हिडिओ विषयानुसार डाऊनलोड करून त्यातून मुलांपर्यंत ते पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही भाषेमध्ये तुम्हाला या कथा व्हिडिओमधून पाहायला मिळतील. 

विषयाचे बंधन नाही 
छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा असो, वा ती राजा-राणीची कथा...स्टोरी टेलर्स विविध विषयांवर कथा सादर करतात. ती पुस्तकांमधील कथा असो वा स्वरचित...साभिनयातून आणि एका विशिष्ट शैलीतून स्टोरी टेलर्स कथा सांगत असतात. त्याला मुलांचीही दाद मिळत आहे. 

ऑनलाइन गोष्टी कशा पाहताल?
स्टोरी टेलर्सची अधिकृत संकेतस्थळे आणि फेसबुक पेजवर हे व्हिडिओ पाहायला मिळतील. कथांच्या विषयानुसार आणि भाषेनुसार या कथांची विभागणी केलेली असते. स्टोरी टेलर्सचे संकेतस्थळ आणि पेज सर्च केले, तर हे व्हिडिओ आपल्याला सापडू शकतात.

सध्या स्टोरी टेलर्सची संख्या वाढतेय. त्याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लहानग्यांच्या कल्पनाविश्‍वाला स्पर्श करणाऱ्या कथांचे जग आम्ही त्यांच्यासाठी घेऊन येतो. त्यासाठी सोशल मीडियाचाही वापर होत आहे. भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यात एक संस्कार रुजावा, यासाठी स्टोरी टेलर्स काम करीत आहेत. या नव्या पर्यायाला मुलांसह पालकांचीही पसंती मिळत आहे. 
- संध्या टाकसाळे, स्टोरी टेलर

स्टोरी टेलर्सकडून कथा ऐकायला मज्जा येते. न ऐकलेल्या गोष्टी ऐकता येतात. त्यामुळे धमाल वाटते. मी अशा कार्यक्रमांना नक्कीच जाते. आई-बाबा नेहमी या कार्यक्रमांना घेऊन जातात. तसेच, यू-ट्यूबवरही वेगवेगळ्या स्टोरी टेलर्सच्या स्टोरी पाहायला मिळतात.
- आर्या जोशी, विद्यार्थिनी

तुम्हीही बनू शकता स्टोरी टेलर
आपण तयार केलेला गोष्टीचा व्हिडिओ काही संकेतस्थळं, फेसबुक पेज आणि यू-ट्यूबवर अपलोड करू शकतो. त्यासाठी खास संकेतस्थळ, फेसबुक पेजवर ऑप्शन देण्यात आले आहेत. स्टोरी टेलिंग हे तरुणांसाठीही करिअरचे ऑप्शन ठरत आहे. 

Web Title: professional story tailors children