कोरोनाची परिस्थिती पाहूनच निर्णय घेण्याचे प्राध्यापकांचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

प्राचार्य आणि प्राध्यापक आताच महाविद्यालये सुरू करण्यास उत्सुक नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आढावा घ्या, मगच निर्णय घ्या, गडबड कशाला करता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पुणे - एकीकडे कोरोनाचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालये सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी प्राचार्यांची बैठकही घेतली जाणार आहे. मात्र, प्राचार्य आणि प्राध्यापक आताच महाविद्यालये सुरू करण्यास उत्सुक नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आढावा घ्या, मगच निर्णय घ्या, गडबड कशाला करता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून नववी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरविण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना व लस आलेली नसल्याने शिक्षक, पालक, संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास विरोध केला. त्यामुळे पुण्यासह अनेक ठिकाणी सोमवारपासून शाळा उघडणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकीकडे शाळा बंदच राहणार असताना दुसरीकडे पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे प्राचार्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली. 

'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

याबाबत प्राचार्य, प्राध्यापक यांनी आताच महाविद्यालये सुरू करण्यास विरोध केला आहे. रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा काही दिवसांनी ती बंद करण्याची नामुष्की येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यापीठाने जरा सबुरीने घ्यावे, अशी भूमिका प्राध्यापकांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. यासंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

महाविद्यालयांमधील प्रशासकीय काम सुरू झाले आहे पण वर्ग कधी सुरू करायचे, याबाबत "यूजीसी'च्या निर्देशानुसार संबंधित विद्यापीठ निर्णय घेईल. 
- डॉ. धनराज माने 

दिल्ली, मध्यप्रदेश या राज्यांसह अनेक शहरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे दिसत आहे. पुण्यामध्येदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाविद्यालये आताच सुरू करू नयेत. विद्यापीठाने आणखी 15 दिवस वाट पाहून, यावर निर्णय घेतला पाहिजे. 
डॉ. सुधाकर जाधवर, सचिव, प्राचार्य महासंघ 

विद्यापीठाने सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन जानेवारीत शक्‍य असेल तर महाविद्यालय सुरू करावीत. तसेच प्राध्यापकांची कोरोना टेस्ट करून, ती सुरू करणे हा परिणामकारक उपाय नाही. 
- सोपान राठोड, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: professor appeal to make a decision based on Coronavirus situation