प्रचाराची धामधूम संपली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पुणे - शहरात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम रविवारी सायंकाळी संपल्याने सर्वत्र राजकीय शांतता पसरली. दुसरीकडे छुपा प्रचार करीत विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचण्याचा खल उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सुरू केला. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांना घराबाहेर काढणे, "पोलिंग एजंट' नेमण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. 

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने 10 दिवस शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या सभा गाजविल्या. निवडणुकीत बाजी मारण्याच्या उद्देशाने सर्वच पक्षाच्या प्रमुखांसह आजी-माजी मंत्री प्रचारात सहभागी झाले होते. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेते रजा मुराद, "एमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार अकबरद्दीन ओवेसी यांच्या सभांनी प्रचार शिगेला पोचला. 

प्रचाराची धामधूम रविवारी सायंकाळी संपल्यानंतर चौकाचौकांतील राजकीय पक्षांचे झेंडे, फलक आणि उमेदवारांची छायाचित्रे उतरविली आहेत. त्यानंतर मात्र मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेट घेत, त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार घरोघरी पोचून रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. तसेच, मतदान आणि मतमोजणीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू होती. 

Web Title: promotion ended