पौड फाटा-शिवणे मेट्रोचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - पौड फाटा ते वारजे- शिवणे मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. हा मार्ग झाल्यास वारजे, कर्वेनगर, कर्वे रस्ता आदी भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.

पुणे - पौड फाटा ते वारजे- शिवणे मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. हा मार्ग झाल्यास वारजे, कर्वेनगर, कर्वे रस्ता आदी भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समितीला हा प्रस्ताव सादर केला होता. वारजे, शिवणे, उत्तमनगर या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. यामुळे कर्वे रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत आहे. नदीपात्रातील रस्त्याचे काम रखडले आहे. या पार्श्‍वभूमीवर पौड फाटा ते वारजे- शिवणे या मार्गावर मेट्रो सुरू केली तर वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होईल. वारजे भागात औद्योगीकरण, माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या झाल्या आहेत. भविष्याचा विचार करता या भागात मेट्रो सुरू करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या मार्गाचा महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून डीपीआर करून घ्यावा. या अहवालासाठी लागणारा खर्च महापालिकेने करावा, असा प्रस्ताव मोहोळ यांनी दिला होता. त्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

कोथरूड, वारजेकरांसाठी सोयीस्कर
वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग पौड फाटा येथून जात आहे. पौड फाटा येथून शिवण्यापर्यंत स्वतंत्र मार्गिका करता येऊ शकते. कोथरूड गावठाण, डहाणूकर कॉलनी, नवसह्याद्री सोसायटी, हिंगणे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, वारजे या भागातील नागरिकांना मेट्रो मार्गामुळे सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होईल.

Web Title: Proposal of Poud Phata-Shiva Metro