रुग्णांना दर्जेदार सेवा पुरवावी : आमदार भरणे

रुग्णांना दर्जेदार सेवा पुरवावी : आमदार भरणे

इंदापूर : इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा द्या, वैद्यकीय अधीक्षक यांनी मुख्यालयात राहावे, रुग्णालयाचे प्रश्न सोडविण्यासाठी रुग्ण कल्याण समिती समवेत दर सोमवारी बैठक घ्यावी, रोज कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांची नावे रुग्णांना दिसतील, अशी सूचना फलकावर लावावीत. तसेच एकमेकात संवाद ठेवून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या तत्वाने सर्वांनी रुग्णांना दर्जेदार सेवा पुरवावी अशा सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात 11 डिसेंबर रोजी सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नांदापूरकर, सहाय्यक आरोग्य संचालक डॉ. संजय देशमुख, तहसीलदार सोनाली मेटकरी, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या उपस्थितीत रुग्ण कल्याण समिती, नागरिक यांची झालेली बैठक वादळी ठरली. यावेळी गफूरभाई सय्यद यानी उप-जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग डॉक्टरांनी रुग्णास सिझर करावे लागेल म्हणून सांगून रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र, रुग्णालयात वीज नसल्याने रुग्णास बारामती किंवा ससूनला जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालय प्रवेशद्वाराजवळच सदर स्त्रीची नैसर्गिक प्रसूती झाली. मात्र, तिचे बाळ दगावले. त्यामुळे सीझर करावे लागेल, असे सांगणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे तीन स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली.

तसेच या घटनेस जबाबदार डॉक्टरवरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी केली. यावेळी जातीवाचक उल्लेख झाल्याने परिस्थिती संवेदनशील बनली. मात्र, आमदार भरणे यांनी यावेळी सर्वांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिल्याने पुढील प्रसंग टळला. 

आमदार भरणे म्हणाले, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांचे झाले आहे. मात्र, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या नाहीत. भिगवण ट्रॉमा सेन्टर, बावडा रुग्णालयाचे काम झाले आहे मात्र रिक्त जागांचा पाठपुरावा सुरू आहे. रुग्णांना सबबी सांगू नका तर त्यांना दर्जेदार आरोग्यसुविधा द्या. त्यासाठी रोटरी सारख्या समाजसेवी संस्थांचे सहकार्य घ्या. डोळे तपासणीसाठी दर आठवड्यास तज्ञ येणे गरजेचे आहे. सोनोग्राफी, ईसीजी सारख्या तपासण्या होणे गरजेचे आहे. बाहेरचा डॉक्टर येऊन ढवळाढवळ करत असेल तर त्याच्या वर तात्काळ कारवाई करण्याचा आदेश त्यांनी दिला. 

यावेळी रुग्णकल्याण समितीचे सदस्य बाळासाहेब ढवळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, नगरसेवक पोपट शिंदे व अनिकेत वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे, प्रशांत सिताप, रमेश शिंदे, सुधीर मखरे, अनिल राऊत, उज्वला चौगुले, महादेव लोखंडे यांनी रुग्णालयाच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी सर्वांच्या प्रश्नास उत्तरे दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com