मनोरुग्णाचा खेळ...निष्पाप बारामतीकराचा बळी गेला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

मनोरुग्णाचा खेळ : निष्पाप बारामतीकराचा बळी गेला...

बारामती : शहरातील मनोरुग्णांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता, आता मात्र मनोरुग्णांची विकृती लोकांच्या जीवावर उठली असून पोलिस व नगरपालिका आता नेमकी काय भूमिका घेणार या कडे बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

रविवारी (ता. 14) शहरातील कसब्यात नेहमीप्रमाणे हातगाडीवर भाजीविक्री करणारे फारुख इसाक तांबोळी (वय 52 ) यांच्यापुढे काय वाढून ठेवल आहे याची यत्किंचितही कल्पना कोणालाच नव्हती. भाजी विक्री करताना अचानकच अनिकेत सुरेश शिंदे हा अंदाजे 22 वर्षीय युवक फारुख यांच्याजवळ आला आणि दारु प्यायला 20 रुपये द्या अशी मागणी त्याने केली. फारुख यांनी तो अनोळखी असल्याने त्याला पैसे देण्यास नकार दिला, त्या नंतर तो तेथून गेला पण काही क्षणातच तो पुन्हा परत आला आणि काही कळण्याच्या आतच फारुख यांच्या डोक्यावर अँडजेस्टबल पान्ह्याने जोरदार प्रहार केला.

हेही वाचा: पुण्यात होणारी सायन्स कॉंग्रेस रद्द

काही क्षणात हा हल्ला झाल्यामुळे फारुख यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही, ते जमिनीवर कोसळले, तेथील लोकांनी अनिकेत यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. फारुख यांच्यावर सुरवातीला बारामतीत आणि त्या नंतर पुण्यात उपचार करण्यात आले, मात्र छोट्या मेंदूला दुखापत झाल्याने आज (ता. 17) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

बारामती शहरात अनेक ठिकाणी मनोरुग्ण असलेल्या स्त्री पुरुषांची संख्या लक्षणीय आहे, यातील काही हिंसक बनतात, त्याचा त्रास लोकांना होतो, अनेकदा वाहनावरील लोकांना दगड फेकून मारणे, चालत्या वाहनावरुन लोकांना खाली ओढणे, दुखापत करणे, वस्तू पळवून नेणे असे अनेक प्रकार हे मनोरुग्ण करतात. मानवतेच्या दृष्टीकोनातून अनेक जण त्यांना मदत करत असले तरी काही मनोरुग्ण लोकांच्या जीवीताच्या दृष्टीने धोकादायक आहेत.

हेही वाचा: हवेली पोलिसांचं 'वरातीमागून घोडं'; अखेर पोलीस अधीक्षकांनी घातलं लक्ष

या संदर्भात माहिती घेतली असता बारामती शहरात स्त्री पुरुष मनोरुग्णांची नेमकी संख्या ना पोलिसांकडे आहे ना नगरपालिकेकडे. या बाबत पाठपुरावा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आता हेच काम करायचे बाकी होते, अशा शब्दात सुनावले जाते, त्या मुळे या बाबत फार कोणी तक्रार करतच नाहीत. आज मात्र एका निष्पाप नागरिकाला प्राणाला मुकावे लागल्यानंतर नगरपालिका, पोलिस व आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करुन बारामतीकरांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

वरिष्ठांनीही यात लक्ष घालून जबाबादारी निश्चित करुन देण्याची गरज आहे, भविष्यात निरपराध नागरिकाच्या जीवीतास दुखापत झाली तर त्याची जबाबदारी या अधिका-यांवर निश्चित करण्याची मागणी आता नागरिक करु लागले आहेत.

बारामतीतील मनोरुग्णांची रवानगी मनोरुग्णालयात करा...

निष्पाप नागरिकांच्या जीवाशी मनोरुग्ण खेळतात, अनेकांना दुखापत होते, अनेकांना दवाखान्यापर्यंत जावे लागते, लहान मुलांनाही त्यांचा धोका उदभवतो, फारुख तांबोळी यांच्या घटनेनंतर आता तरी नगरपालिका पोलिसांनी मनोरुग्णांना शहरातून बाहेर काढावे- मुनीर तांबोळी, सामाजिक कार्यकर्ता, बारामती.

loading image
go to top