पुण्यात होणारी सायन्स कॉंग्रेस रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

science congress

पुण्यात होणारी सायन्स कॉंग्रेस रद्द

पुणे : पुण्यामध्ये २२ वर्षांनी होणारी इंडियन सायन्स कॉंग्रेस अखेर रद्द करण्यात आली आहे. कोरोनामुळे एकदा पुढे ढकलत जानेवारी २०२२ मध्ये पुण्यात सायन्स काँग्रेसचे आयोजन निश्चित केले होते. मात्र, पुण्यासह जगभरातील कोरोनाचे सावट पाहता आता ही परिषद रद्द करण्यात आली आहे. पुढील आयोजनाबद्दल जानेवारी महिन्यात कार्यकारी मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे.

जानेवारी २०२२ मध्ये सिंबायोसिस अभिमत विद्यापीठात १०८ व्या सायन्स कॉंग्रेसचे आयोजन करण्यात येणार होते. देशासह जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी या काँग्रेसमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या साथीचे सावट अद्यापही पूर्णपणे कमी झालेले नाही. त्यामुळे ही कॉंग्रेस रद्द करण्यात आली, अशी माहिती इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशनच्या सरचिटणीस विद्यालक्ष्मी सक्सेना यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

हेही वाचा: जागतिक ‘सीओपीडी’ दिन विशेष

२१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जानेवारी २०२१ मध्ये पुण्यातील सायन्स कॉंग्रेसची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनाच्या सावटामुळे ती एक वर्षे पुढे ढकलत २०२२ मध्ये आयोजन निश्चित करण्यात आले होते. पुण्यातील ही सायन्स काँग्रेस अवघ्या दीड महिन्यांवर आल्यामुळे शहर आणि परिसरातील शालेय विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, शास्त्रज्ञ आणि संशोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होते. कारण, या आधीची सायन्स काँग्रेस तेव्हाच्या पुणे विद्यापीठात २००० मध्ये झाली होती. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर पुण्यातील आयोजनात सहभागी होण्यास सर्वच नागरिक उत्सूक होते. मात्र, या निर्णयामुळे त्यांच्या आनंदात विरजण पडले आहे.

जगभरातील कोरोना साथीचा प्रसार, प्रवास बंदीची अनिश्चितता आदी कारणांमुळे ही कॉंग्रेससुद्धा रद्द करण्यात आली आहे. सायन्स कॉंग्रेसच्या इतिहासात प्रथमच सलग दोन वर्षे ती पार पडत नाही. आता हे आयोजन थेट २०२३ मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी ठिकाण पुणेच असेल की नाही, या बद्दल अजूनही ठोस सांगता येत नसल्याचे अधिकारी सांगतात. कार्यकारी मंडळाच्या बैठंकींनतर पुढील आयोजनाबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: हवेली पोलिसांचं 'वरातीमागून घोडं'; अखेर पोलीस अधीक्षकांनी घातलं लक्ष

'पुण्यातच सायन्स कॉंग्रेस व्हावी अशी आमची आग्रही मागणी आहे. सायन्स कॉंग्रेससाठी आमची सर्व व्यवस्था सज्ज आहे. राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान आणि शैक्षणिक संस्था पुणे शहरात असल्याने हे विज्ञानाचे केंद्र आहे. २२ वर्षापासून पुण्यात सायन्स कॉंग्रेस झालेली नाही. त्यामुळे आयोजनासाठी आम्हाला प्राधान्य द्यायला हवे.'

- डॉ. राजीव येरवडेकर, आयोजन सचिव

'सायन्स कॉंग्रेसला जगभरातील वैज्ञानिक उपस्थित असतात. मात्र अजूनही कोरोनाचे सावट दूर झालेले नाही. त्यामुळे पुण्यातील २०२२ मधील सायन्स कॉंग्रेस रद्द करण्यात आली आहे. नवीन ठिकाणांबाबत आमच्याकडे पाच शहरांचे प्रस्ताव आले असून, त्यात पुण्याचाही समावेश आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर पुढील सायन्स कॉंग्रेसचा निर्णय होईल.'

- विद्यालक्ष्मी सक्सेना, सरचिटणीस, इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशन

loading image
go to top