गानगुरू पं. बबनराव हळदणकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

पुणे - आग्रा घराण्याचे बुजूर्ग गायक, "कौसी जोग' व "चांदनी मल्हार' सारख्या रागांचे निर्माते, बंदिशकार पं. बबनराव हळदणकर (वय 89) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. गेल्या अर्ध्या दशकाहून अधिक काळ गायनसेवा रुजवणाऱ्या आणि अखेरच्या दिवसांतही आपल्या कार्यात सक्रिय राहिलेल्या हळदणकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. 

पुणे - आग्रा घराण्याचे बुजूर्ग गायक, "कौसी जोग' व "चांदनी मल्हार' सारख्या रागांचे निर्माते, बंदिशकार पं. बबनराव हळदणकर (वय 89) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. गेल्या अर्ध्या दशकाहून अधिक काळ गायनसेवा रुजवणाऱ्या आणि अखेरच्या दिवसांतही आपल्या कार्यात सक्रिय राहिलेल्या हळदणकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. 

पुण्यातील राहत्या घरी शुक्रवारी सकाळी हळदणकर यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. 20) वैकुंठ स्मशानभूमी येथे सकाळी अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याआधी सकाळी नऊपासून त्यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 

हळदणकर यांचा जन्म 1927 मध्ये मुंबई येथे झाला. मूळ नाव श्रीकृष्ण असले, तरीही ते बबनराव याच नावाने परिचित होते. त्यांचे वडील सावळाराम हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार होते. सुरवातीस जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे गायनाची तालीम घेतल्यानंतर हळदणकर यांनी शास्त्रीय संगीताचे पुढील धडे आग्रा घराण्याचे उस्ताद खादिम हुसैन यांच्याकडून घेतले. 

अभ्यासू गायन, लयकारी आणि तिहायांवरील प्रभुत्व, आम रागांची अनोखी मांडणी व अनवट रागांमधील सहज संचार ही हळदणकर यांच्या गायकीची वैशिष्ट्ये. "रसपिया' या नावाने त्यांनी अनेक बंदिशी बांधल्या. कलेच्या क्षेत्रात अशी भरीव कामगिरी करणारा हा कलाकार रसायनशास्त्रातील पदवीधर होता व त्यांनी रसायन उद्योग क्षेत्रात काही वर्षे नोकरीही केली होती. 

शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी हळदणकर यांना चतुःरंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आग्रा व जयपूर गायकीच्या सौंदर्यतत्वांची चर्चा करणाऱ्या "जुळू पाहणारे दोन तंबोरे' या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. तसेच संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांनी मुंबई विद्यापीठात भारतीय संगीताचे प्राध्यापक म्हणून काम केले. अनेक शिष्यही तयार केले. 

Web Title: Pt. Babanrao Haldankar dies

टॅग्स