धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन जनजागृती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला. 

पिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला. 

"प्रवासी लोहमार्ग ओलांडण्याचा पत्करतात धोका' अशा आशयाचे वृत्त "दै.सकाळ' व "इ-सकाळ'मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाले. लगोलग संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी याबाबत जनजागृती करण्यासाठी सकाळीच चिंचवड रेल्वे स्थानक गाठले. फलाट क्रमांक चारवरून पलीकडे लोहमार्ग ओलांडण्याचे प्रमाण जास्त असल्याने कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. 
चिंचवड रेल्वे स्थानकावर एक्‍सप्रेस आणि लोकल ट्रेन थांबल्यानंतर पादचारी पुलाचा वापर न करता बरेच प्रवासी फलाट क्रमांक चारवरून धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडत होते. 

त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कुटूंबासह लोहमार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त होते. त्या प्रवाशांना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते थांबवत होते. तसेच, त्यांना गुलाबाचे फुल देऊन अशा पद्धतीने लोहमार्ग ओलांडणे धोक्‍याचे असल्याचे समजावुन सांगत होते. त्याशिवाय, नियमानुसार पादचारी पुलाने येणाऱ्या प्रवाशांचे प्रतिष्ठानतर्फे स्वागत करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्याची सोय करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, रंजना जोशी, नम्रता बांदल, श्‍वेता गायकवाड, विनोद सुर्वे, तृषाल जाधव, नितीन इंगवले, सुदर्शन दरेकर, सुधीर दरेकर, टी.प्रभाकरन, महेंद्र जगताप, बाळासाहेब शिखरे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. 

Web Title: Public awareness by giving pink flowers to the passengers who cross the road