चित्रातून जनजागृतीपर संदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

चित्रांमागील संकल्पना माझी आहे. स्पाइन सिटी चौकातही पक्षी, कार्टून, स्पायडर मॅन अशी विविध चित्रे काढण्यात येत आहेत. चित्रांबरोबर काही घोषवाक्‍यही केली आहेत. त्यामुळे पर्यावरणविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल, असे वाटते.
- रणजित इंगळे, ठेकेदार, महापालिका 

पिंपरी - ‘‘चित्र काढून त्यातील दिलेल्या संदेशाचा जनजागृतीसाठी उपयोग होतो. मात्र, या कलेतील रोजगाराच्या बेभरवशामुळे भविष्याची चिंता वाटते,’’ असे मत पेंटिंगमधून चित्र रेखाटणारे बाळासाहेब पायमल्ले, दीपक चांदणे यांनी व्यक्त केले. 

महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक भिंतींच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत रणजित इंगळे या ठेकेदाराकडे पायमल्ले, चांदणे काम करतात. त्यांनी एचए कंपनीजवळ भुयारी मार्गात हरीण, सिंह यांसह विविध प्राण्यांची चित्रे रेखाटून त्यातून प्राण्यांविषयी जनजागृती केली आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.

पायमल्ले मूळचे निपाणी (जि. कोल्हापूर) येथील असून, ते सध्या पुण्यात राहतात. तेथे त्यांनी चित्रकला शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र, त्यांना चित्रकला शिक्षकाची नोकरी मिळाली नाही. तसेच, गावाकडे पुरेसा रोजगार मिळत नसल्याने ते २५ वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक झाले. सुरवातीची काही वर्षे साइन बोर्ड, शाळेच्या भिंतींवर चित्रे काढली. त्यानंतर गेल्या सहा-सात वर्षांपासून स्वच्छता अभियानांतर्गत पुणे महापालिकेसाठी विविध भित्तिचित्रे काढली. आठवड्यातून कधी दोन दिवस, कधी चार दिवस; तर कधी महिनाभरही काम नसते.

चांदणे म्हणाले, ‘‘मी मूळचा जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रहिवासी आहे. चित्रकलेची लहानपणापासून आवड होती. त्यामुळे या क्षेत्राकडे वळलो. आई-वडील हातगाडी व्यावसायिक होते. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे उच्च शिक्षण घेता आले नाही, याची खंत वाटते. गेल्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात आहे. सुरवातीला जाहिरात कंपन्यांचे फलक तयार करण्याचे काम केले. त्यानंतर पुणे महापालिकेसाठी विविध भित्तिचित्रे काढली. विश्रांतवाडी येथे ‘पुणे दर्शन’, आळंदी रस्त्यावर ‘पंढरीची वारी’ अशी चित्रे साकारली आहेत. घरातील १६ जण याच क्षेत्रात कार्यरत आहेत. महिन्याला २५ ते ३० हजार रुपये मिळतात. आम्ही काढलेली चित्रे पाहून कौतुक करण्यापेक्षा चित्राबरोबर लिहिलेल्या पर्यावरणविषयक संदेशांचे नागरिकांनी पालन करावे.’

Web Title: Public Awareness Message in Drawing