पुरंदरमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरूच, या गावांमध्ये जनता कर्फ्यू 

corona
corona

 
पुणे : पुरंदर तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून, आजही 16 रुग्ण सापडले आहेत. सासवड व जेजुरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील वाघापूर व नीरा शिवतक्रार या गावांना स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.  

सासवड (पुणे) : सासवड शहरातील कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यात खंड नाही. आजही सहा रुग्ण आढळले. तर, जेजुरीत पाच, वाघापूर येथे दोन, सोनोरी, बेलसर व वनपुरी येथे प्रत्येकी एक, असे दिवसभरात तालुक्यात 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाची रुग्ण संख्या 172 वर पोचली असून, एकट्या सासवड शहरात 110 संख्या झाली आहे. 

पुरंदर तालुक्यातील तब्बल 27 गावांत कोरोना संसर्ग पोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत पाच बळी गेले. परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासकीय मंडळींची धावपळ वाढली आहे. त्यातून आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून कोविड केअर सेंटरची व्याप्ती वाढविणे, पाॅझिटिव्ह रुग्णांची स्थानिक पातळीवर व्यवस्था करणे, आदी नियोजन सुरु झाल्याचे संकेत मिळाले.

गुळुंचे : नीरा परिसरातील वाल्हे, दौंडज, पिंगोरी, लोणंद या भागात कोरोना रुग्ण आढळून येऊ लागल्याने नीरा ग्रामपंचायतीने आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तीन दिवसांसाठी जनता कर्फ्यु राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरा व परिसरातील अनेकजण खरेदी- विक्रीसाठी गावात येत असतात. त्यातच कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने तालुक्यात सासवड, जेजुरी आणि लोणंद येथे बाजारपेठेत जाणाऱ्या लोकांनी आपला मोर्चा नीरा बाजारपेठेकडे वळविला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नीरेत गर्दी पाहायला मिळत होती. या पार्श्वभूमीवर आता तीन दिवसांचा कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे ग्रामपंचायत सदस्य दीपक काकडे व अनिल चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, सायंकाळी पाच नंतरही दुकाने सुरू ठेवल्याने काही दुकांनावर कारवाई करण्यात आली असून, नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कर्फ्यूसाठी सहमत असल्याचे मत व्यापारी संघटनेकडून व्यक्त करण्यात आले. 

गराडे :  वाघापूर (ता. पुरंदर) या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी तीन व आज दोन, असे पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीचे उपाय म्हणून गावातून दिवसाआड औषधाची फवारणी केली जात आहे. तसेच, सर्व कुटुंबांना सॅनेटायझर वाटप करण्यात आले आहे. वाघापूर, चौफुला व गाव, असा परिसर तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेविका विजया भगत यांनी दिली.

दरम्यान, भिवरी ( ता. पुरंदर ) येथे काल एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. भिवरी येथील घिसरेवाडीजवळील घाटेवस्ती येथील ही महिला असून, ती प्रसूतीसाठी भारतीय हॉस्पिटल या ठिकाणी दाखल झाली होती. प्रसूतीनंतर ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर करण्यात आले. याबाबत माहिती समजल्यानंतर घाटे वस्ती येथील तीन मजली इमारत औषध फवारणी करून येथील लोक क्वारंटाइन करण्यात आले. तसेच, या भागात प्रवेश बंदी, असा बोर्ड लावण्यात आला आहे, अशी माहिती ग्राम विकास अधिकारी अविनाश निगडे यांनी दिली.
 
Edited By : Nilesh Shende
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com