Loksabha 2019 : पुण्यात आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात प्रचाराची सांगता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

- भाजपने बारामतीला केले लक्ष्य 
- विकासाच्या मुद्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा 
- राज ठाकरे यांची ठरली सर्वांत मोठी सभा 
- पुण्यात अखेरच्या दिवशी भाजप-कॉंग्रेसचे शक्तिप्रदर्शन 

पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावती जाहीर सभांमुळे पुणे आणि बारामती मतदारसंघातील वातावरण तापले. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांच्या गदारोळात प्रचाराचा रविवारी (ता. 21) समारोप झाला. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेसाठी जाण्यापूर्वी पुण्यात मुक्काम केला; परंतु त्यांची सभा झाली नाही, तर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पुण्यात आले परंतु त्यांनी निवडक विद्यार्थ्यांशीच संवाद साधला. 

बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गेले महिनाभर बारामतीमध्ये तापलेल्या राजकीय वातावरणात कडक उन्हाची पर्वा न करता मतदारांनीही दोन्ही पक्षांच्या सभांना उत्साही प्रतिसाद दिला. बारामतीमध्ये झालेल्या प्रचाराच्या समारोप सभेत शरद पवार यांनी भाजपला आव्हान देतानाच इतके लक्ष दिले तरी काही फरक पडणार नाही, असे सांगितले; तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूरमध्ये झालेल्या सभेत पवारांचे विश्‍वासघातकी राजकारण संपवा, असे आवाहन मतदारांना केले. बारामतीची जागा ताब्यात घेण्यासाठी भाजपने पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह 20 नेत्यांना बारामतीमध्ये प्रचारादरम्यान आणले होते. 

पुण्यातही भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी सहाही विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा समारोप केला; तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी महात्मा फुले मंडईत झालेल्या सभेत सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 

वंचित विकास आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचाराचा समारोप पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेने झाला. कडक उन्हातही या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. 

- भाजपने बारामतीला केले लक्ष्य 
- विकासाच्या मुद्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा 
- राज ठाकरे यांची ठरली सर्वांत मोठी सभा 
- पुण्यात अखेरच्या दिवशी भाजप-कॉंग्रेसचे शक्तिप्रदर्शन  

Web Title: public meetings of the former Chief Minister in pune