नो-पार्किंग, नो हॉल्टिंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

पुणे - शहरातील रस्त्यांवरून फेरफटका मारताना काही प्रमुख चौकांमध्ये पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले चौकोन (यलो बॉक्‍स जंक्‍शन) दिसून येतात. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. मात्र, वाहनचालकांना आता त्याकडे दुर्लक्ष करणे खिशाला परवडणारे नाही. कारण, पोलिसांकडून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकास दंड आकारला जाऊ शकतो.

जर आपण विचार करीत असाल की हे नेमके पिवळ्या रंगाचे चौकोन काय आहेत; तर चिंता करण्याची गरज नाही. ‘यलो बॉक्‍स जंक्‍शन’चा प्रयोग पहिल्यांदा १९६७ मध्ये लंडनमध्ये करण्यात आला. आपण ‘यलो बॉक्‍स जंक्‍शन’मध्ये प्रवेश कराल, त्या वेळी तुमचे वाहन तेथे न थांबवता चौकातून पुढे जाणे गरजेचे आहे. नो-पार्किंग आणि नो हॉल्टिंग. तुम्हाला उजवीकडे वळायचे असेल, समोरून किंवा बाजूने वाहन आले तरच तेथे थांबू शकता. 

शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोल्हाई चौकात, विधानभवन चौकात ‘यलो बॉक्‍स जंक्‍शन’ केले आहेत. प्रमुख वर्दळीच्या स्वारगेट येथील जेधे चौक, पुणे स्टेशन, बस स्थानक, सिमला चौक, मोठी रुग्णालये आणि अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर अशा स्वरूपाचे ‘यलो बॉक्‍स जंक्‍शन’ तयार करणे  अपेक्षित आहे.

दंडाची तरतूद
मोटार वाहन कायद्यानुसार, ‘यलो बॉक्‍स जंक्‍शन’वर थांबल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येतो. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंग, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकास २०० रुपये, तसेच सिग्नल तोडल्यास २०० रुपये दंडासोबतच वाहन परवानाही रद्द करण्याची तरतूद आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘यलो बॉक्‍स जंक्‍शन’वर तात्पुरत्या स्वरूपातही वाहन थांबविता येत नाही. प्रमुख चौकांमधील सिग्नलचे उल्लंघन, थांबापट्टीच्या (स्टॉप लाइन) पुढे येऊन थांबणे आणि ‘यलो बॉक्‍स जंक्‍शन’वर थांबणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक.

Web Title: puine news No-parking no halting