पुण्यात पाऱ्याने पुन्हा ओलांडली चाळिशी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

पुणे - उन्हाच्या तडाख्याने पुणेकर हैराण झाले आहेत. दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री उकाडा, असे वातावरण सध्या पुणे आणि परिसरात आहे. शहरात बुधवारी 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या एप्रिलमधील हे उच्चांकी तापमान असून, पुढील चोवीस तासांमध्ये कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. राज्यात भिरा येथे सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

शहरात शनिवारपासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. गेल्या गुरुवारी (ता. 6) 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सरासरीच्या तुलनेत हा कमाल तापमानाचा पारा 0.2 अंश सेल्सिअसने कमी नोंदला गेला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांमध्ये दिवसाच्या तापमानाचा पारा सातत्याने वाढत आज त्याने चाळिशी ओलांडली. मार्चच्या शेवटी शहरात कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या वर गेला होता. 

शहर आणि परिसरात रात्रीचे तापमान मात्र अद्यापही सरासरीपेक्षा कमी आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 18.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा हे तापमान 1.6 अंश सेल्सिअसने कमी असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. मात्र, दिवसभरातील उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मध्यरात्रीनंतरही हवा गरम असते. त्यामुळे रात्रीचा उकाडा वाढल्याचा अनुभव पुणेकर घेत आहेत. 

पुढील चोवीस तासांमध्ये उन्हाची तीव्रता वाढणार असून, कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या शुक्रवारी (ता. 14) दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होऊन, कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस नोंदला जाईल. येत्या मंगळवारपर्यंत (ता. 18) आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याने 37 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाचा पारा कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

मध्य महाराष्ट्र तापला 
मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, तेलंगण, पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तराखंड येथील तापमान सरासरीपेक्षा 1.6 ते 3 अंश सेल्सिअस वाढले असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राजस्थानवरून उष्ण आणि कोरडे वारा महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने येथील तापमानाचा पारा पुढील काही दिवस सरासरीपेक्षा वाढलेला असेल. 

असा वाढला पारा (कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये) 
6 एप्रिल ........ 37.4 
7 एप्रिल ........ 37.7 
8 एप्रिल ........ 36.6 
9 एप्रिल ........ 38.7 
10 एप्रिल ........ 39.5 
11 एप्रिल ........ 39.4 
12 एप्रिल ........ 40.1 
............

Web Title: Pune @ 40