
पुणे : आगाखान पॅलेसचा पाणी पुरवठा सुरळीत
पुणे : दोन कोटी रुपयांची पाणी पट्टी भरली नाही म्हणून महापालिकेने ऐतिहासिक आगाखान पॅलेसचे पाणी तोडले होते. त्यासंदर्भात आज (ता. २३) पुरातत्त्व खात्यासोबत झालेल्या बैठकीत टप्प्याटप्प्याने थकबाकी भरली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याने पाणी पुरवठा पुर्ववत केला आहे.नगर रस्त्यावर आगाखान पॅलेस ही राष्ट्रीय स्तरावरील पुरातन वास्तू आहे. याठिकाणी महात्मा गांधी यांना ब्रिटिशांनी नजरकैद करून ठेवल्याने या वास्तूला विशेष महत्त्व आहे. तसेच या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी व स्वीय सहाय्यक महादेव भाई देसाई यांची समाधी देखील आहे. या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक भेट देतात. या पॅलेसच्या परिसरात ब्रिटिशकालीन उद्यान आहे. त्यामुळे या वास्तूच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
आगाखान पॅलेसला महापालिकेने तीन नळ जोड दिले आहेत. पण त्यांना १९८९ पासून पाणी पट्टी न भरल्याने थकबाकी २ कोटीवर गेली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी उद्यानाचे नळ जोड तोडण्यात आल्याने भर उन्हाळ्यात पाणी नसल्याने येथील बाग वाळून गेली आहे. हा प्रकार समोर आल्याने पुरातत्त्व विभाग आणि महापालिका या दोघांच्याही कारभारावर टीकेची झोड उठली होती.पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली तसेच या राष्ट्रीय वारसा असलेल्या इमारतीचे महत्त्व जतन करण्यासाठी असे प्रसंग टाळायला हवेत अशीही चर्चा करण्यात आली. पुरातत्त्व खात्याने टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची तयारी दाखवली आहे. महापालिकेनेही उद्यानाचा पाणी पुरवठा पुर्ववत केला आहे.
शुद्ध केलेले पाणी वापरण्याची सूचना
आगाखान पॅलेसच्या उद्यानाचे पाणी पुन्हा सुरू केले असले तरी उद्यानासाठी पिण्याचे पाणी वापरू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. आज महापालिकेने याठिकाणी दोन टँकर मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील (एचटीपी) शुद्ध केलेले पाणी त्यांच्या टाकीत टाकले आहेत. पुरातत्त्व खात्यानेही महापालिकेच्या केंद्रातील पाणी उद्यानासाठी वापरण्यासाठी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
पुरातत्त्व खात्याचा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आगाखान पॅलेसचा पाणी पुरवठा पुर्ववत केला आहे. त्यांनी पैसे भरण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच एचटीपीचे शुद्ध केलेले पाणी उद्यानासाठी वापरण्याचे मान्य केले आहे.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
Web Title: Pune Aga Khan Palace Water Supply Municipal Corporation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..