Pune Rain आंबेगाव तालुक्यात सातगाव पठार भागात ढगफुटी सदृश्य पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain

बटाटा पिकाचे पंधरा कोटी रुपयांचे ; नुकसान दिवाळीत शेतकरी राजावर कोसळले अस्मानी संकट

Pune Rain : आंबेगाव तालुक्यात सातगाव पठार भागात ढगफुटी सदृश्य पाऊस

मंचर :आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात शनिवारी सकाळी सहा ते सात या वेळेत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे आरणीमध्ये साठवलेल्या बटाट्याला पाण्याचा वेढा पडला आहे. अनेकांचे शेतात साठवलेले बटाटे पुराच्या पाण्यात वाहून गेले.

शिल्लक असलेला बटाटा ही सडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन दिवाळीत दोन हजार शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पारगाव तर्फे खेड (ता.आंबेगाव) येथे तर गावात, वस्त्यावर, रस्त्यांना ओढ्या व नद्यांचे स्वरूप आले होते. या भागातील कुरवंडी, कारेगाव, पेठ, थूगाव, भावडी, कोल्हारवाडी आदी गावात ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका बसला.

पावसाचा कोप झाला. पारगावच्या प्रवेश द्वारासमोरच रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले. अनेक गुरांच्या गोठ्यात पाणी शिरले आहे. तासाभरात बटाटाचे होत्याचं नव्हतं झालं. उघड्या डोळ्यांनी हे संकट पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिवाळी सणात आनंदाऐवजी दुःखाचे अश्रू वाहत होते.

याबाबत पारगाव येथील बटाटा उत्पादक रमेश सावंत पाटील म्हणाले “ ता.५ ऑक्टोबर रोजी गावातील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी सरासरी प्रत्येकी दहा ते १५ टन बटाटे काढून शेतात अरण लावून सागाची पाने व गवताच्या पेंढ्या पसरवून बटाटा साठवून ठेवला होता. पण शनिवारी सकाळी ढगफुटी झाली. आरणीला पाण्याने वेढा दिला.

बटाट्याच्या ढिगात पाणी शिरले. त्यामुळे चार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशीआलेला घास अति पावसाने हिरावून घेतला आहे. हे संकट दूर करण्याचे काम ताबडतोब राज्य शासनाने करावे अशी मागणी पेठ गावचे सरपंच संतोष धुमाळ यांनी केली आहे.

“सातगाव पठारभागात दरवर्षी खरीप हंगामात शेतकरी मुख्य पिक म्हणून बटाटा वाणाची जुलै महिन्यात लागवड करतात. यावर्षी पाच हजार एकर क्षेत्रात बटाटा लागवड झाली होती. गेली आठ ते दहा दिवस बटाटा काढणीची कामे सुरु होती. ७० टक्के शेतजमिनीतील बटाटा काढणीचे काम शेतकऱ्यांनी पूर्ण केले होते.

अजूनही एक हजार ५०० एकर क्षेत्रातील बटाटा पिक काढणी अभावी जमिनीतच आहे. आरणीतील व शेतातील बटाटा सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.”

“या भागात अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांबरोबर करार पद्धतीची बटाटा शेती केली आहे.बटाटा वाण, औषधे, खते, मजुरी, मशागत असा एकरी ७० हजार रुपये खर्च येतो. गेल्या आठ दिवसापूर्वीच पण आस्मानी संकट कोसळले.

दिवाळी साजरी करणेही अवघड झाले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने बटाटा अरणी व शेतातील बटाट्याचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी.बटाटा पिकाचा राज्य शासनाच्या पिक विमा योजनेमध्ये समावेश करावा. ही प्रलंबित मागणी मार्गी लावावी.”

- अशोक बाजारे, बटाटा उत्पादक शेतकरी भावडी (ता.आंबेगाव)

“आंबेगाव व जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडलकर व आंबेगाव तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार बटाटा पिकाचे नुकसानीचे पंचनामे कृषी, ग्रामसेवक व कामगार तलाठी यांच्या मार्फत सुरु केले आहे.”

- टी. के चौधरी, कृषी अधिकारी आंबेगाव तालुका.