रिंगरोडच्या फाइलची धाव सुसाट

रिंगरोडच्या फाइलची धाव सुसाट

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ‘रिंगरोड’चा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महिनाअखेरीस मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पायाभूत समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्‍चिम भागात रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, त्याला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. या मार्गाला राज्य महामार्गाचा दर्जादेखील मिळाला आहे. प्रकल्पाचा ‘सर्वंकष अहवाल’ तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडची एकूण लांबी सुमारे १३२ किलोमीटर असून, रुंदी ११० मीटर आहे. ही रुंदी नव्वद मीटर करण्याचे प्रस्तावित आहे.

खेड, शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्‍यांतून हा रिंगरोड जाणार आहे. त्यासाठी २३०० हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून, प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.  भूसंपादनासाठी सुमारे साडेसातशे ते नऊशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

रिंगरोड शहरात येणाऱ्या महामार्गांसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या जवळून जाणार आहे. महिनाअखेर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत रिंगरोडचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. समितीची मान्यता मिळाल्यानंतर त्यास मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

रुंदी वाढविण्यासाठी मार्गातील जागा राखीव
रिंगरोडच्या मधोमध तीस मीटर रुंदीची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात साठ मीटरचा रिंगरोड करण्यात येणार आहे. भविष्यात गरज पडल्यास रिंगरोडची रुंदी आणखी वाढणे शक्‍य व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पीएमआरडीएकडून हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये या रिंगरोडचा समावेश करण्यात आला आहे.

असा असेल दुसरा टप्पा
एमएसआरडीसीकडून पहिल्या टप्प्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पूर्व भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. तो मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मूळ, सोनोरी, दिवे, चांबळी, हिवरे, गराडे, कांबरे, वरवे बुद्रुक असा असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com