विरोधक भोपळा फोडणार, की युती व्हाइट वॉश देणार?

संभाजी पाटील 
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

लोकसभा निवडणुकीत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत मताधिक्‍य मिळवणाऱ्या भाजपला विधानसभेसाठी मात्र आठही मतदारसंघांत कडवी झुंज द्यावी लागणार असे दिसते.

पुणे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ऐनवेळची उमेदवारी, भाजपने चार ठिकाणी मांडलेला नव्या उमेदवारांचा डाव, ‘मनसे’ला एका मतदारसंघात विरोधकांचा मिळालेला पाठिंबा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे चेहरे; तर काँग्रेसने उभे केलेले महापालिकेच्या राजकारणातील मुरब्बी उमेदवार यामुळे संपूर्ण राज्याचे पुण्याच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुण्यात विरोधी पक्ष ‘भोपळा’ फोडणार की भाजप ‘व्हाइट वॉश’ देऊन ‘निकाल’ लावणार, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. गुरुवारच्या निकालानंतर पुण्यातील राजकारणाचे नवे पर्व सुरू होणार आहे.

शहरात घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र मे महिन्यातच झालेल्या  लोकसभा निवडणुकीचा निकाल, शहरात झालेला प्रचार, रंगलेल्या सभा पाहता मतदारांचा कल बदलेल, असे चित्र नाही. 

लोकसभा निवडणुकीत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत मताधिक्‍य मिळवणाऱ्या भाजपला विधानसभेसाठी मात्र आठही मतदारसंघांत कडवी झुंज द्यावी लागणार असे दिसते. या वस्तुस्थितीमुळे शहरातील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, विरोधी पक्ष आपले खाते उघडणार का, याबाबत उत्सुकता आहे. कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देऊन भाजपने पुण्यातील आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

‘राष्ट्रवादी’चा प्रभाव असणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भाजप वाढविणाऱ्या पाटील यांना पुण्यात उमेदवारी देऊन भाजपने एकाचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. कोथरूड मतदारसंघात १ लाख ९४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, भाजपला शहरात सर्वाधिक आघाडी मिळण्याची आशा या मतदारसंघात आहे. ‘आतला’, ‘बाहेरचा’ की ‘पक्षाचा’ यापैकी मतदार कोणाला निवडणार, ते काही तासांमध्येच स्पष्ट होईल.

हडपसर मतदारसंघात विरोधकांच्या आशा लागल्या आहेत. हडपसरमध्ये भाजपसमोर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेने आव्हान निर्माण केले असून, बदलाची सर्वाधिक शक्‍यता असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे; तर भाजपने सर्व ताकद पणाला लावल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वडगाव शेरी या काँग्रेस आघाडीच्या पारंपरिक मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व दुसऱ्यांदा सिद्ध होणार काय, हे स्पष्ट होईल. पुण्याचे राजकारण आता गावकी-भावकीत राहिलेले नाही, यावर येथील निकालावरून शिक्कामोर्तब होईल.

पुण्याची राजकीय सूत्रे आतापर्यंत बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, अजित पवार, गिरीश बापट यांच्याकडे राहिली. या निवडणुकीत ही सूत्रे चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाणार की एखादा नवा नेता ती स्वीकारणार, हेही काही तासांतच स्पष्ट होईल.

‘हॅटट्रिक’ करण्यास उत्सुक
पर्वती आणि खडकवासल्यात भाजप ‘हॅटट्रिक’ करण्यास उत्सुक आहे. खडकवासला कोणाचा, हेही हा निकाल अधोरेखित करेल. खासदार गिरीश बापट यांनी ५० हजारांच्या मताधिक्‍याने भाजपचा उमेदवार कसब्यात विजयी होणार, हे फळ्यावर सहीसह लिहून दिले. ‘हेडमास्तरां’चा हा अंदाज खरा ठरला, तर कसब्याच्या राजकारणातही नवी एन्ट्री होणार आहे. शिवाजीनगर आणि पुणे कॅंटोन्मेंटमध्ये भाजपने दुसऱ्या फळीला संधी दिली आहे. दोन्ही ठिकाणी निश्‍चित चुरस दिसेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Assembly Constituency Who will be victorious in Pune