Pune band : हडपसर-मांजरी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसादासह कडकडीत बंद

हांडेवाडी रस्ता, सातवनगर, होळकरवाडी, हांडेवाडी, औताडेवाडी परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग
Pune band : हडपसर-मांजरी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसादासह कडकडीत बंद

उंड्री : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ आज (मंगळवार, ता. १३) विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या "पुणे बंद'मध्ये महंदवाडी, उंड्री-पिसोळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हांडेवाडी रस्ता, सातवनगर, होळकरवाडी, हांडेवाडी, औताडेवाडी परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. औषधालये, दूध डेअरी, रुग्णालये, भाजीपाला आणि काही ठिकाणी चहाच्या टपरी वगळता नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. उंड्री चौक, उंड्रीसिटी, कडनगर चौकादरम्यान बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.

राजकीय पक्षाला पाठिंबा न देता, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर या भावनेने आम्ही बंदमध्ये सहभागी झालो आहोत, अशी भावना किरकोळ विक्रेत्यांसह फेरीवाल्यांनी व्यक्त केली. दुपारी चारनंतर हळूहळू दुकाने उघडली जातील, असा विश्वासही विक्रेत्यांनी व्यक्त केला. उंड्री परिसरामध्ये कोणत्याही संघटनेचे किंवा राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते दुकाने बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर फिरले नाहीत, तरीही व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतल्याचे पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य निवृत्त बांदल यांनी सांगितले.

कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर उंड्री चौकामध्ये अवघे दोन ठेकेदार आले, त्यामुळे दोघांनाच रोजगार मिळाला. इतरांना रोजगाराविना घरी परत जावे लागले. आमचे हातावरचे पोट आहे, रोजगार मिळाला, तर सायंकाळी चूल पेटते. हाताला काम मिळाले नाही, त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी वाईट दिवस ठरला.

- ज्ञानेश्वर कांबळे, मजूर (उंड्री चौक)

हडपसर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हडपसर-मांजरी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक व्यवस्थेसह विविध संस्था, व्यापारी, भाजी मंडई, किरकोळ व्यापारी यांनी कडकडीत बंद पाळला. दुपारी तीन वाजल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. आज सकाळपासूनच परिसरात बंदचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने कामावर निघालेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. ठिकठिकाणच्या बसथांब्यावर मोठी गर्दी दिसत होती. त्याचा फायदा काही रिक्षाचालकांनी घेतला. पाचसहा प्रवासी बसवून व जादा भाडे आकारून त्यांनी सेवा पुरवली. तासभर वाट पाहिल्यानंतर बस डेपोमधून अधिकाऱ्यांनी दहा बसेस मार्गावर सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाश्यांनी भरलेल्या बस कार्यकर्त्यांनी अडवून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत बस पुन्हा डेपोमध्ये पाठवल्या.

हडपसर गाव गांधी चौक येथे महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह संभाजी ब्रिगेट, मराठा सेवा संघ, राष्ट्र सेवा दल, जनता दल आदी संस्था संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. राज्यपाल कोशारी यांची पदावरून हकालपट्टी करा अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने वानवडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकीवरून निषेध रॅली काढण्यात आली होती.

आमदार चेतन तुपे, ज्येष्ठ विचारवंत सुभाष वारे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, फारुख इनामदार, योगेश ससाणे, वैशाली बनकर, निलेश मगर, विजय देशमुख, विठ्ठल विचारे, महेश टेळे, संदीप लहाने पाटील, विठ्ठल सातव, प्रशांत सुरसे, संजय शिंदे, संजीवनी जाधव, दिलीप गायकवाड, महेंद्र बनकर, उत्तम कामठे, डॉ. शंतनु जगदाळे, अमर तुपे, अविनाश काळे, रमजान शेख, विवेक तुपे आदींनी हडपसर येथे तर काँग्रेस पक्षाच्या वतीने वानवडी ते हडपसर अशी दुचाकी रॅली काढली होती. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रशांत तुपे, नितीन आरू, अभिजीत शिवरकर, वैभव डांगमाळी, गणेश फुलारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com