
भीती दाखविण्यासाठी पत्नीला पिस्तूल दाखवणे पतीच्या चांगलेच अंगलट आले आहे.
पुणे- भीती दाखविण्यासाठी पत्नीला पिस्तूल दाखवणे पतीच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांच्यातील वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेल्यावर दोन गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे पोलिसांच्या हाती लागली आहेत. या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या पतीसह बारामतीमधील एका सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. चंदननगर पोलिसांनी ही कारवाई केली.बाळासाहेब उमाजी मदने (रा. चौधरी वस्ती) व सुग्रीव अंकुश भंडलकर (रा.बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुग्रीव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर ग्रामीण पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
आसगावकर गुरूजीच शिक्षकांचे आमदार; पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलिस ठाण्यात एका महिलेने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दिली होती. पतीकडे काडतुसे असल्याने आपल्या जिवाला भीती असल्याची माहिती तिने त्यावेळी पोलिसांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पतीला चौकशीसाठी बोलावून घेतले. तो कारमधून पोलिस ठाण्यात आल्यावर त्याच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये चार काडतुसे आढळून आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरी गावठी पिस्तूल असल्याचे सांगितले. त्याच्या घराच्या झडतीत एक गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली. यानंतर मदनेला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात आली.
चौकशीदरम्यान त्याने पिस्तूल व काडतुसे सुग्रीवकडुन 40 हजार रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी बारामती तालुक्यातील खोडस येथे जाऊन सुग्रीवला ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीत एक गावठी पिस्तूल व चार काडतुसे सापडली. त्याचे रेकॉर्ड तपासले असता, तो ग्रामीण भागातील सराईत गुंड असल्याचे निष्पन्न झाले.