पुणे-बारामती डीएमयू धावणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

पुणे - पुणे स्टेशनहून बारामतीला सायंकाळी पावणेसात वाजता सोडण्यात येणाऱ्या पॅसेंजरऐवजी आता डीएमयू सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी बारामतीवरून परत येताना दौंडला मुक्कामी थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी दौंड स्टेशनवरून पुण्याच्या दिशेने येणार आहे. त्यामुळे पुणे-दौंड मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोकल सेवेचा लाभ दौंडकर प्रवाशांना आता सकाळच्या वेळेतही घेता येणार आहे.

पुणे- दौंड रेल्वे मार्गावर रेल्वे विभागाने दोन दिवसांपूर्वी डीएमयूच्या सेवेला प्रारंभ केला. मात्र, डीएमयूचे वेळापत्रक निश्‍चित करताना दौंडहून पुण्याला येणाऱ्या नोकरदारांना विचारात घेतले नव्हते. दौंडहून आणि त्यामार्गाहून पुण्याला येणाऱ्या नोकरदार व विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

दौंड लोकल प्रामुख्याने दौंडच्या प्रवाशांच्या समस्या सोडविणारी ठरेल, असे बोलले जात होते. मात्र, वेळापत्रकामध्ये दौंडहून दुपारी 12 वाजून 43 मिनिटांनी आणि चार वाजून मिनिटांनी पुण्यासाठी गाडी सुटणार असे जाहीर करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाने आता सकाळी सातपासून दौंडवरून गाडी सोडण्यास सुरवात केली आहे. सोमवारी सायंकाळी बारामतीला गेलेली डेमू मंगळवारी सकाळी सात वाजता दौंडवरून सुटणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी दिली.

Web Title: pune-baramati dmu