कॅंटोन्मेंट, वडगाव शेरीची रिपब्लिकनकडून मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

 विधानसभा निवडणुकीत कॅंटोन्मेंट आणि वडगाव शेरी मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षाकडे केली आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नुकतीच चर्चा केली आहे. 

पुणे - विधानसभा निवडणुकीत कॅंटोन्मेंट आणि वडगाव शेरी मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षाकडे केली आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नुकतीच चर्चा केली आहे. 

रिपब्लिकन पक्ष 2014 पासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीसोबत आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकही जागा दिली नव्हती. मात्र यंदा पुण्यातून दोन मतदारसंघ मिळालेच पाहिजे, यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी बाह्या सावरल्या आहेत. कॅंटोन्मेंट मतदारसंघातून उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेश चव्हाण, तर वडगाव शेरीमधून डॉ. धेंडे, पक्षाचे माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, अय्यूब शेख आदी इच्छुक आहेत. या दोन्ही मतदारसंघात मागासवर्गीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराला सुमारे 24 हजार मते मिळाली होती. त्याची भाजपने दखल घ्यावी आणि दोन्ही मतदारसंघांतून रिपब्लिकन पक्षाला संधी द्यावी, अशी मागणी आठवले तसेच राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. 

रिपब्लिकन पक्षाने साथ दिल्याच्या बदल्यात भाजपने धेंडे यांना उपमहापौरपद आणि हिमानी कांबळे यांना स्थायी समितीचे सदस्यत्त्वपद दिले आहे. शहरात तसेच पिंपरी-चिंचवडमधील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणतेही महामंडळ अथवा समिती, सदस्यत्वपद मिळालेले नाही, याकडेही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत. दोन्ही लोकसभा निवडणुकांत तसेच मागील विधानसभेतही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा मनापासून प्रचार केला होता. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ आता रिपब्लिक पक्षाला मिळावे, अशी मागणी पक्षाने लावून धरली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Cantonment and vadgaon sheri constituency demanded by RPI